World Cup 2019 : दुखापतग्रस्त शिखर धवनऐवजी ऋषभ पंतच्या निवडीला आयसीसीचा हिरवा कंदील
दुखापतग्रस्त शिखर धवनऐवजी ऋषभ पंतच्या निवडीला आयसीसीने मान्यता दिली आहे.
लंडन : दुखापतग्रस्त शिखर धवनऐवजी ऋषभ पंतच्या निवडीला आयसीसीने मान्यता दिली आहे. याबाबतचं एक ट्विट आयसीसीने केलं आहे. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये एकदा टीमची निवड झाल्यानंतर खेळाडूला दुखापत झाली तर त्याला बदली खेळाडू मिळण्यासाठी आयसीसीची परवानगी घ्यावी लागते. शिखर धवनला दुखापत झाल्यानंतर बीसीसीआयने याबाबत आयसीसीकडे परवानगी मागितली होती. यानंतर आता आयसीसीने ऋषभ पंतच्या समावेशाला हिरवा कंदील दिला आहे.
अंगठ्याच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचा गब्बर सलामीवीर शिखर धवनला वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. शिखर धवनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचवेळी बॅटिंग करताना डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीतून धवन १०-१२ दिवसांमध्ये बरा होईल, असा अंदाज होता पण धवनला दुखापतीतून बरं व्हायला जास्त कालावधी लागणार आहे, त्यामुळे त्याला वर्ल्ड कपला मुकावं लागणार आहे.
शिखर धवनला पर्याय म्हणून ऋषभ पंत हा आधीच इंग्लंडला रवाना झाला होता. पण बीसीसीआयने आयसीसीकडे या बदलाची मागणी केली नव्हती. शिखर धवन हा वेळेत फिट होईल, अशी आशा टीम इंडियाला होती. ऋषभ पंतला आधीच बदली खेळाडू म्हणून घेण्यात आलं असतं तर दुखापतीतून सावरल्यानंतर धवनला परत टीममध्ये घेता आलं नसतं. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या दुसऱ्या खेळाडूला दुखापत झाली असती तरच धवनची पुन्हा टीममध्ये निवड करता आली असती, त्यामुळेच टीम इंडियाने धवनसाठी बदली खेळाडूची मागणी केली नव्हती. पण आता धवनची दुखापत लवकर बरी होणार नसल्याचं लक्षात आल्यामुळे अखेर टीम इंडियाला हा निर्णय घ्यावा लागला.
९ जूनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये बॅटिंग करताना शिखर धवनच्या अंगठ्याला बॉल लागला. या मॅचमध्ये शिखर धवननं शतक केलं होतं. आयसीसी स्पर्धांमध्ये धवनने ६ शतकं केली आहेत. यातली ३ शतकं वर्ल्ड कपमधली आहेत. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये धवनची कामगिरी कायमच उल्लेखनीय राहिली आहे.
टीम इंडियाचा वर्ल्ड कपचा पुढचा सामना शनिवार २२ जूनला अफगाणिस्तानविरुद्ध आहे. या मॅचमध्ये ऋषभ पंतला संधी मिळणार का हे पाहणं औत्सुक्याचं आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये धवनऐवजी केएल राहुल ओपनिंगला आला होता. तर विजय शंकरला संधी देण्यात आली होती.