मॅनचेस्टर : वर्ल्ड कपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव केला. मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात झालेल्या या मॅचमध्ये भारताने पाकिस्तानचा ८९ रननी धुव्वा उडवला. भारताचा ओपनर रोहित शर्मा हा या विजयाचा शिल्पकार ठरला. रोहित शर्माने ११३ बॉलमध्ये १४० रनची खेळी केली. यामध्ये १४ फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहितचं शतक आणि केएल राहुल, विराट कोहलीच्या अर्धशतकामुळे भारताने पाकिस्तानला विजयासाठी ३३७ रनचं आव्हान दिलं. पण पाकिस्तानने बॅटिंग करताना वारंवार विकेट गमावल्यामुळे त्यांना हे आव्हान पेललं नाही.


पाकिस्तानविरुद्ध शतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. या मॅचनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित शर्माने मजेशीर उत्तर दिलं. या संकटाच्या काळात तू पाकिस्तानच्या बॅट्समनना कोणता सल्ला देशील? असा सवाल रोहित शर्माला एका पत्रकाराने विचारला. तेव्हा मी पाकिस्तानचा प्रशिक्षक झालो, तर नक्की तुम्हाला सांगेन, असं उत्तर रोहित शर्माने दिलं.



या वर्ल्ड कपमधलं रोहित शर्माचं हे दुसरं शतक होतं. याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धही रोहितने शतकी खेळी केली होती. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये त्याने अर्धशतक केलं होतं. न्यूझीलंडविरुद्धची मॅच पावसामुळे रद्द झाल्याने रोहितला बॅटिंगची संधी मिळाली नव्हती. भारताचा पुढचा सामना २२ जूनला अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे.