मॅन्चेस्टर : वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये रोहित शर्माने धमाकेदार शतक झळकावलं. रोहित शर्माने ८५ बॉलमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. रोहित शर्माने ११३ बॉलमध्ये १४० रनची खेळी केली. रोहितच्या या खेळीमध्ये १४ फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

७३ बॉलमध्ये ८५ रनवर असताना रोहित शर्माने हसन अलीला सिक्स मारला. या सिक्ससह रोहित शर्मा नव्वदीमध्ये पोहोचला. रोहित शर्माने मारलेल्या या सिक्सने क्रिकेटप्रेमींना सचिन तेंडुलकरच्या सिक्सची आठवण करुन दिली.


पाहा रोहित शर्माचा तो सिक्स



२००३ वर्ल्ड कपमध्ये सचिन तेंडुलकरने शोएब अख्तरलाही अशाच पद्धतीने अपर कटची सिक्स मारली होती. याच मॅचमध्ये विरेंद्र सेहवागनेही याच पद्धतीने सिक्स लगावली होती.


रोहित शर्माचं वनडे क्रिकेटमधलं हे २४वं शतक होतं. सर्वाधिक शतक करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने वनडे क्रिकेटमध्ये ४९ शतकं केली आहेत. तर विराट कोहलीच्या नावावर ४१ शतकं आहेत.


वनडेमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित नवव्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर (४९ शतकं), विराट कोहली (४१ शतकं), रिकी पाँटिंग (३० शतकं), सनथ जयसूर्या (२८ शतकं), हाशिम आमला (२७ शतकं), एबी डिव्हिलियर्स, क्रिस गेल आणि कुमार संगकारा यांनी प्रत्येकी २५-२५ शतकं लगावली आहेत.


रोहित शर्माचं या वर्ल्ड कपमधलं हे दुसरं शतक आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्येही शतक केलं होतं. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये रोहितने अर्धशतकी खेळी केली होती. न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला होता.