मुंबई : २०१९ क्रिकेट वर्ल्ड कपच्या अत्यंत रोमहर्षक अशा फायनलमध्ये इंग्लंडचा विजय झाला. या मॅचमध्ये इंग्लंडचा विजय झाला असला तरी न्यूझीलंड मात्र पराभूत झाली नाही असंच म्हणावं लागेल. कारण इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामधली ही फायनल टाय झाली. मॅच टाय झाल्यामुळे सुपर ओव्हर खेळवण्यात आली, पण सुपर ओव्हरही टाय झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या न्यूझीलंडने ५० ओव्हरमध्ये २४१/८ पर्यंत मजल मारली. यानंतर बॅटिंगला आलेल्या इंग्लंडचा ५० ओव्हरमध्ये २४१ रनवरच ऑल आऊट झाला. यानंतर सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने १५ रन करून न्यूझीलंडला १६ रनचं आव्हान दिलं, पण न्यूझीलंडलाही सुपर ओव्हरमध्ये १५ रनच करता आल्या. पण मॅचमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडपेक्षा जास्त फोर मारल्यामुळे इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आलं.


'सर्वाधिक फोर'वर वर्ल्ड कप विजेता घोषित करण्याच्या आयसीसीच्या नियमांवर अनेक क्रिकेट रसिक आणि माजी क्रिकेटपटूंनी आक्षेप घेतले आहेत. इंग्लंडची टीम ऑल आऊट झाल्यामुळे न्यूझीलंडलाच विजेता घोषित करायला पाहिजे होतं, असं अनेकांचं म्हणणं आहे.


या सगळ्या वादात आता भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्मानेही प्रतिक्रिया दिली आहे. क्रिकेटमधल्या काही नियमांचा निश्चितच पुनर्विचार केला गेला पाहिजे, असं ट्विट रोहित शर्माने केलं आहे.




माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनेही आयसीसीच्या नियमांवर निशाणा साधला आहे. वर्ल्ड कप फायनलचा निकाल ज्या टीमनी जास्त बाऊंड्री मारल्या त्यावर कसा ठरवला जाऊ शकतो? हे समजण्या पलीकडचं आहे. आयसीसीचा हा नियम हास्यास्पद आहे. ही मॅच टाय झाली पाहिजे होती. पण एवढी रोमांचक मॅच खेळल्याबद्दल न्यूझीलंड आणि इंग्लंड टीमला शुभेच्छा. दोन्ही टीम विजेत्या आहेत, असं ट्विट गंभीरने केलं.