World Cup 2019 : धोनी-केदारच्या बॅटिंगवर सचिन नाराज
वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने अफगाणिस्तानविरुद्ध ११ रननी निसटता विजय मिळवला.
साऊथम्पटन : वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने अफगाणिस्तानविरुद्ध ११ रननी निसटता विजय मिळवला. टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाला ५० ओव्हरमध्ये ८ विकेट गमावून २२४ रनच बनवता आल्या. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने एमएस धोनी आणि केदार जाधव यांच्या धीम्या बॅटिंगवर नाराजी व्यक्त केली आहे. केदार जाधव आणि धोनी यांच्यासह मधल्या फळीतील बॅट्समनमध्ये सकारात्मक बॅटिंगची कमी दिसली, असं सचिन म्हणाला.
जसप्रीत बुमराहने टाकलेल्या शेवटच्या काही ओव्हर आणि अखेरच्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमीने घेतलेल्या हॅट्रिकमुळे टीम इंडियाचा विजय झाला. मोहम्मद नबीने ५५ बॉलमध्ये ५२ रन करुन अफगाणिस्तानला विजयाच्या जवळ आणलं होतं.
भारतीय टीमच्या बॅटिंगवर प्रतिक्रिया देताना सचिन म्हणाला, 'केदार आणि धोनीच्या पार्टनरशीपमुळे मी निराश झालो. या दोघांनी संथ खेळी केली. स्पिन बॉलिंगविरुद्ध आपण ३४ ओव्हरमध्ये फक्त ११९ रन केले. याबाबतीत भारतीय खेळाडू अडचणीत दिसले. सकारात्मकतेचीही कमी जाणवली.'
धोनी आणि केदार जाधव यांनी पाचव्या विकेटसाठी ८४ बॉलमध्ये ५७ रनची पार्टनरशीपक केली. या पार्टनरशीपमध्ये धोनीने ३६ बॉलमध्ये २४ आणि केदार जाधवने ४८ बॉलमध्ये ३१ रन बनवले. एमएस धोनी ५२ बॉलमध्ये २८ रन करुन आऊट झाला. तर जाधवला ६८ बॉलमध्ये ५२ रन करता आले.
'टीम इंडियाने प्रत्येक ओव्हरमध्ये दोन ते तीन बॉलवर एकही रन केली नाही. कोहली ३८व्या ओव्हरला आऊट झाला. यानंतर ४५व्या ओव्हरपर्यंत भारतीय टीमला जास्त रन करता आल्या नाहीत. मधल्या फळीतील बॅट्समनना जास्त संधी मिळाली नाही, म्हणून ते दबावात होते. असं असलं तरी त्यांना थोडी आक्रमकता दाखवायला पाहिजे होती,' असं मत सचिनने मांडलं.
'जाधवला बॅटिंगची संधी मिळाली नव्हती, त्यामुळे धोनीने जबाबदारी घ्यायला पाहिजे होती. याआधी जास्त बॅटिंग मिळत नसल्यामुळे जाधव दबावात होता. या स्पर्धेत त्याला फक्त पाकिस्तानविरुद्ध ८ बॉल खेळायला मिळाले होते. त्यामुळे त्याला पार्टनरची गरज होती, जो सुरुवातीला जबाबदारी घेईल, पण असं झालं नाही,' अशी खंत सचिनने मांडली.