World Cup 2019 : भारत-पाकिस्तान सामन्याआधी `जाहिरात` वाद, सानिया म्हणते...
वर्ल्ड कपमधला सगळ्यात महत्त्वाचा असा भारत-पाकिस्तान सामना १६ जूनला खेळवण्यात येणार आहे.
मुंबई : वर्ल्ड कपमधला सगळ्यात महत्त्वाचा असा भारत-पाकिस्तान सामना १६ जूनला खेळवण्यात येणार आहे. या मॅचआधी दोन्ही देशांकडून जाहिरातीद्वारे एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण यामध्ये पाकिस्तानने आपली पातळी सोडल्याचं पाहायला मिळालं. या मॅचची जाहिरात करताना पाकिस्तानमधल्या जॅझ टीव्हीने भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन यांची खिल्ली उडवली.
अभिनंदन यांची खिल्ली उडवल्यामुळे पाकिस्तानी माध्यमांवर सोशल मीडियावरून टीका करण्यात येत आहे. भारताची टेनिसपटू आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकची पत्नी सानिया मिर्झा हिने या जाहिरातींमधल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
'दोन्ही देशांनी भारत-पाकिस्तान मॅचआधी जाहिराती केल्या आहेत. भारत-पाकिस्तान मॅचचा प्रसार करण्यासाठी अशा मूर्खपणाची गरज नाही. या मॅचचा आधीच प्रसार आणि प्रचार झाला आहे. देवसाठी तरी क्रिकेटला क्रिकेटच राहू द्या,' असं ट्विट सानिया मिर्झाने केलं आहे.
याआधी स्टार स्पोर्टसच्या जाहिरातीद्वारे पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे. मौका-मौका या जाहिरातीत पाकिस्तानवर निशाणा साधला होता. या जाहिरातीतून फादर्स डेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानवर टीका केली होती.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये १६ जूनला मॅच होणार आहे. त्यातच १६ जून हा फादर्स डे आहे, त्यामुळे फादर्स डेचं औचित्य साधून ही जाहिरात बनवण्यात आली आहे. या जाहिरातीत एक जण पाकिस्तानची जर्सी घालून, एक जण बांगलादेशची जर्सी घालून आणि एक जण टीम इंडियाची जर्सी घालून दाखवण्यात आला आहे.