लंडन : २०१९ क्रिकेट वर्ल्ड कप आता अंतिम टप्प्यात आला असला तरी स्पर्धेचा रोमांच अजूनही कायम आहे. कारण सेमी फायनलसाठीच्या टीम अजूनही ठरलेल्या नाहीत. वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये सध्या तरी फक्त ऑस्ट्रेलियाच्या टीमने प्रवेश केला आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये उरलेल्या टीमचं चित्र स्पष्ट होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या पॉईंट्स टेबलवर नजर टाकली तर सेमी फायनलमध्ये उरलेल्या तीन स्थानांसाठी ५ टीममध्ये स्पर्धा आहे. यामध्ये भारत, न्यूझीलंड, इंग्लंड, पाकिस्तान आणि बांगलादेश या टीमचा समावेश आहे. सगळ्या टीमच्या ९ मॅच संपल्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये जी टीम पहिल्या क्रमांकावर असेल ती चौथ्या क्रमांकाच्या टीमशी सेमी फायनल खेळेल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या टीममध्ये दुसरी सेमी फायनल होईल.


पॉईंट्स टेबलमध्ये सध्या पहिल्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचा उरलेला एकमेव सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा या वर्ल्ड कपमधला फॉर्म बघता या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय होऊ शकतो. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला तर ते ९ मॅचपैकी ८ मॅचमध्ये विजय आणि एका मॅचमध्ये पराभवासह १६ पॉईंट्सवर राहतील. पॉईंट्स टेबलमधल्या इतर कोणत्याही टीम आता १६ पॉईंट्स गाठू शकणार नाहीत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर राहू शकते.


टीम इंडियाच्या उरलेल्या दोन्ही मॅच या बांगलादेश आणि श्रीलंका यांच्याविरुद्ध आहेत. या दोन्ही मॅचमध्ये टीम इंडियाचा विजय झाला तर त्यांचे १५ पॉईंट्स होतील. दोन्ही मॅच जिंकल्या तर भारतीय टीम पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिल. यातल्या एकाही मॅचमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला तरी त्यांच्या दुसऱ्या क्रमांकाला धक्का लागणार नाही, अशीच शक्यता जास्त आहे.


न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यामधला सामना या वर्ल्ड कपमधल्या सेमी फायनलच्या टीम ठरवेल. या मॅचमध्ये इंग्लंडने विजय मिळवला तर ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंड या टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवतील. असा निकाल लागला तर ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर, भारत दुसऱ्या क्रमांकावर, इंग्लंड तिसऱ्या आणि न्यूझीलंड चौथ्या क्रमांकावर राहिल.


या चारही टीमनी सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला तर पहिली सेमी फायनलही ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात आणि दुसरी सेमी फायनल भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये होईल.


पाकिस्तानला अजूनही अपेक्षा


इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा पराभव झाल्यामुळे पाकिस्तानला धक्का बसला असला तरी त्यांनाही सेमी फायनल प्रवेशाची संधी आहे. यासाठी पाकिस्तानला बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये विजय मिळवला आणि न्यूझीलंडने इंग्लंडचा पराभव केला, तर पाकिस्तान सेमी फायनलची चौथी टीम ठरेल. पण न्यूझीलंडचा पराभव झाला, तर मात्र पाकिस्तानचं आव्हान जवळपास संपुष्टात येईल. इंग्लंडने न्यूझीलंडचा २२५-२५० रननी पराभव केला तरच नेट रनरेटच्या जोरावर पाकिस्तान सेमी फायनलमध्ये प्रवेश करु शकेल, पण हे सध्या तरी अशक्य दिसत आहे.


न्यूझीलंडने इंग्लंडचा आणि पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव केला, तर पाकिस्तानची टीम चौथ्या क्रमांकावर राहिल. त्यामुळे ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान आणि भारत-न्यूझीलंड यांच्यात सेमी फायनलची लढत होईल.


बांगलादेशही शर्यतीत


सेमी फायनलच्या प्रवेशासाठी बांगलादेशची टीमही अजून शर्यतीत आहे. सेमी फायनलचं आव्हान कायम ठेवण्यासाठी बांगलादेशला पाकिस्तानला मोठ्या फरकाने हरवावं लागेल, तर दुसरीकडे इंग्लंडचा न्यूझीलंडविरुद्ध मोठ्या फरकाने विजय व्हावा लागेल.


असे निकाल लागले तर सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना बांगलादेशशी आणि भारताचा सामना न्यूझीलंडशी होईल.