लंडन : पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरने बाबर आजमला सल्ला दिला आहे. तू विराट कोहलीला आपला आदर्श मानतोस, तर आपल्या आदर्शासारखी बॅटिंग कर, असं शोएब अख्तर म्हणाला आहे. बाबर आझमने विराटसारखं मॅचची परिस्थिती पाहून खेळावं आणि त्याच्या सारख्याच मोठ्या खेळी कराव्या. बाबर महत्त्वपूर्ण रन तर करत आहे, पण तो मॅच संपवत नाही, अशी खंत शोएबने व्यक्त केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना शोएब म्हणाला, 'मी बाबरला सांगू इच्छितो जर तू विराटला आदर्श मानत असशील तर त्याच्यासारखं खेळायलाही शिक. विराटने कठीण परिस्थितीमध्ये रन केले आहेत. बाबरला विराटसारख्या रन करायच्या असतील तर त्याला विराटसारखा नवेपणा आणणं शिकावं लागेल.'


'जर तुम्ही विराट, रोहित आणि केन विलियमसन या खेळाडूंना बघितलंत तर ते अर्धशतक केल्यानंतर रनची गती वाढवतात. बाबरला या खेळाडूंपासून शिकायला मिळेल. त्याच्याकडे आणखी शॉट असले पाहिजेत,' असं शोएब म्हणाला. या व्हिडिओमध्ये शोएबने हारिस सोहेलचं कौतुक केलं. रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये हारिस सोहेलने ५९ बॉलमध्ये ८९ रन केले. बाबरने या मॅचमध्ये ८० बॉलमध्ये ६९ रनची खेळी केली.