World Cup 2019 : दक्षिण आफ्रिकेच्या इम्रान ताहिर-जेपी ड्युमिनीची निवृत्ती
क्रिकेट वर्ल्ड कपचा शेवटचा टप्पा जसा जवळ आलाय, तसंच दिग्गज क्रिकेटपटू निवृत्तीची घोषणा करत आहेत.
मॅनचेस्टर : क्रिकेट वर्ल्ड कपचा शेवटचा टप्पा जसा जवळ आलाय, तसंच दिग्गज क्रिकेटपटू निवृत्तीची घोषणा करत आहेत. शुक्रवारी पाकिस्तानचा खेळाडू शोएब मलिकने निवृत्ती घेतल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेच्या इम्रान ताहिर आणि जेपी ड्युमिनी यांनीही संन्यास घ्यायचा निर्णय घेतला आहे.
इम्रान ताहिर याने भावनिक पोस्ट लिहून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. 'हा माझ्यासाठी भावनात्मक क्षण आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी वनडेमध्ये मी अखेरचा मैदानात उतरणार आहे. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत सोबत असणाऱ्यांचा आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचा मी आभारी आहे. त्यांच्यामुळेच माझं स्वप्न पूर्ण झालं,' असं ट्विट इम्रान ताहिरने केलं.
२०११ वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमधून इम्रान ताहिरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या मॅचआधी इम्रान ताहिरने १०६ वनडे मॅचमध्ये १७२ विकेट घेतल्या. इम्रान ताहिर वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे. जेपी ड्युमिनीने २००४ साली श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं.
दक्षिण आफ्रिकेची या वर्ल्ड कपमधली कामगिरी निराशाजनक झाली. वर्ल्ड कपच्या ८ मॅचपैकी फक्त २ मॅचमध्येच त्यांना विजय मिळवता आला, तर ५ मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. १ मॅच पावसामुळे रद्द झाली.