ढाका : ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. या वर्ल्ड कपसाठी आता प्रत्येक क्रिकेट बोर्ड स्वत:च्या टीमची घोषणा करत आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डानेही वर्ल्ड कपसाठीच्या १५ सदस्यीय खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. वर्ल्ड कपच्या टीममध्ये निवड न झाल्यामुळे बांगलादेशचा फास्ट बॉलर तसकीन अहमद ढसाढसा रडला आहे. मीडियाशी बोलताना तसकीन अहमदला अश्रू अनावर झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड कप टीममध्ये निवड न झाल्यामुळे खेळाडूच्या रडण्याची बांगलादेश क्रिकेटमधील ही दुसरी घटना आहे. याआधी २०१५ वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये निवड न झाल्यामुळे बांगलादेशचा क्रिकेटपटू मशर्फे मुर्तजालाही रडू कोसळलं होतं. पण आज कठोर मेहनतीमुळे मुर्तजाची वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.



तसकीन अहमदने बांगलादेशकडून ३२ वनडे मॅचमध्ये ५.९५ च्या सरासरीने ४५ विकेट घेतल्या आहेत. तसकीन अहमदने एकवेळा इनिंगमध्ये ५ विकेटही घेतल्या आहेत. ऑक्टोबर २०१७ पासून टीममधून बाहेर असलेल्या तसकीन अहमदला दुखापतीने ग्रासलं आहे. त्यामुळे बांगलादेश बोर्डाने तसकीनची निवड केली नाही.


लवकरच बांगलादेशच्या टीममध्ये पुनरागमन करू असा विश्वास तसकीनने व्यक्त केला आहे. दुखापतीनंतर तसकीनने बांगलादेश प्रिमियअर लीग म्हणजेच बीपीएलमध्ये पुनरागमन केलं होतं. बीपीएलमध्ये तसकीनने १२ मॅचमध्ये २४ विकेट घेतल्या होत्या. पण एका मॅचदरम्यान कॅच पकडताना तसकीनला दुखापत झाली.


बांगलादेशच्या वर्ल्ड कप टीममध्ये तसकीनऐवजी अबू जायेद याची निवड झाली आहे. अबू जायेदनं आत्तापर्यंत बांगलादेशकडून एकही वनडे मॅच खेळली नाही. अबू जायेदनं बीपीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती. अबू जायेद बांगलादेशकडून टी-२० आणि टेस्ट मॅच खेळला आहे.


वर्ल्ड कपसाठी बांगलादेशची टीम


तमीम इक्बाल, लिटन दास, सौम्य सरकार, मुश्फिकुर रहीम, महमदुल्लाह, शाकिब अल हसन, मशर्फे मुर्तजा (कर्णधार), मोहम्मद मिथुन, शब्बीर रहमान, मोसाद्देक हुसैन, मोहम्मद सैफुद्दीन, मेहदी हसन, रुबेल हुसैन, मुस्तफिजुर रहमान, अबू जायेद