World Cup 2019 : वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची घोषणा
३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई : ३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. १५ सदस्यांच्या भारतीय टीममध्ये अपेक्षेप्रमाणेच फारसे आश्चर्यकारक बदल करण्यात आले नाहीत. अंबाती रायुडूला मात्र वर्ल्ड कपच्या टीममधून डच्चू देण्यात आला आहे. तर ऋषभ पंत याच्याऐवजी दिनेश कार्तिकवर निवड समिती आणि विराट कोहलीने विश्वास दाखवला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वामध्ये भारतीय टीम हा वर्ल्ड कप खेळणार आहे, तर रोहित शर्मा उपकर्णधार आहे. १५ सदस्यांच्या या भारतीय टीममध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार हे तीन फास्ट बॉलर, युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव हे दोन स्पिनर, तसंच हार्दिक पांड्या, विजय शंकर, रवींद्र जडेजा आणि केजार जाधव हे चार ऑल राऊंडर आहेत. रवींद्र जडेजा आणि केदार जाधव यांचा उपयोग स्पिनर म्हणून आणि हार्दिक पांड्या, विजय शंकर यांचा वापर मध्यमगती बॉलर म्हणून करता येईल.
अशी असणार भारतीय टीम
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, केएल राहुल, विजय शंकर
२३ एप्रिलपर्यंत प्रत्येक टीमला त्यांच्या खेळाडूंची यादी आयसीसीला द्यावी लागणार आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपसाठीची टीम जाहीर केली आहे. टीममधील एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर बदली खेळाडूची घोषणा २३ मेपर्यंत करता येणार आहे. वर्ल्ड कपसाठी टीमची घोषणा करणारी न्यूझीलंड ही पहिली टीम आहे. तर पाकिस्तानने वर्ल्ड कपसाठीच्या २३ संभाव्य खेळाडूंची घोषणा केली आहे. यातल्या १५ जणांची वर्ल्ड कपच्या टीममध्ये निवड होणार आहे.
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, विंडीज आणि दक्षिण आफ्रिका या १० टीम सहभागी होणार आहेत. यावेळच्या फॉरमॅटनुसार प्रत्येक टीम एकमेकांविरुद्ध एक मॅच खेळेल, म्हणजेच प्रत्येक टीम ग्रुप स्टेजमध्ये ९ मॅच खेळणार आहे. यातल्या टॉप-४ टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील.
३० मेपासून वर्ल्ड कपला सुरुवात होत असून १४ जुलैला लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर वर्ल्ड कपची फायनल खेळवली जाईल. ९ जुलै आणि ११ जुलैला दोन सेमी फायनल होणार आहेत.
वर्ल्ड कपमधल्या भारताच्या मॅच
५ जून- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
९ जून- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
१३ जून- भारत विरुद्ध न्यूझीलंड
१६ जून- भारत विरुद्ध पाकिस्तान
२२ जून- भारत विरुद्ध अफगाणिस्तान
२७ जून- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
३० जून- भारत विरुद्ध इंग्लंड
२ जुलै- भारत विरुद्ध बांगलादेश
६ जुलै- भारत विरुद्ध श्रीलंका
वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमधल्या सगळ्या मॅच या भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होतील. स्टार स्पोर्ट्सकडे वर्ल्ड कप मॅचच्या प्रसारणाचे अधिकृत अधिकार आहेत. तर मॅचचं लाईव्ह स्ट्रिमिंग हॉटस्टारवर बघता येईल.
भारताचे दोन सराव सामने
दरम्यान वर्ल्ड कप सुरु होण्याआधी प्रत्येक टीम दोन सराव सामने खेळणार आहे. भारताचा पहिला सराव सामना न्यूझीलंडशी २५ मे रोजी आणि दुसरा सराव सामना बांगलादेशशी २८ मे रोजी होणार आहे. या सराव सामन्यांना आंतरराष्ट्रीय मॅचचा दर्जा नसेल. या सराव सामन्यांमध्ये प्रत्येक टीमला सगळ्या १५ खेळाडूंना खेळण्याची मुभा देण्यात आली आहे. पण फिल्डिंगवेळी मात्र फक्त ११ खेळाडूच मैदानात असतील.