मुंबई : इंग्लंडमध्ये होणारा ५० ओव्हरचा वर्ल्ड कप आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ३० मेपासून वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यासाठी भारतीय टीमची घोषणा १५ एप्रिलला होणार आहे. मुंबईमध्ये वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीमची घोषणा होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२३ एप्रिलपर्यंत प्रत्येक टीमला त्यांच्या खेळाडूंची यादी आयसीसीला द्यावी लागणार आहे. तर या यादीमधल्या एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर बदली खेळाडूची घोषणा २३ मेपर्यंत करता येणार आहे. वर्ल्ड कपसाठी टीमची घोषणा करणारी न्यूझीलंड ही पहिली टीम आहे. तर पाकिस्तानने वर्ल्ड कपसाठीच्या २३ संभाव्य खेळाडूंची घोषणा केली आहे. यातल्या १५ जणांची वर्ल्ड कपच्या टीममध्ये निवड होणार आहे.



चौथ्या क्रमांकाची समस्या


वर्ल्ड कपसाठीची भारतीय टीम जवळपास निश्चित असली तरी चौथ्या क्रमांकावर कोणाला खेळवायचं ही समस्या अजूनही कायम आहे. चौथ्या क्रमांकासाठी भारतीय टीमने बऱ्याच खेळाडूंना संधी दिली, पण यातल्या एकाही खेळाडूला संधीचं सोनं करता आलं नाही. त्यातल्या त्यात अंबाती रायुडूनं चौथ्या क्रमांकावर बऱ्यापैकी कामगिरी केली. पण गेल्या दोन महिन्यांमध्ये अंबाती रायु़डूचा फॉर्म ढासळला आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्येही रायुडूला चमकदार कामगिरी करता आलेली नाही.


आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याचा फॉर्म निवड समितीसाठी दिलासा देणारा ठरेल. मागच्या ७ महिन्यांपासून हार्दिक पांड्या दुखापत आणि वादामुळे भारतीय टीमबाहेर होता.


भारताची वर्ल्ड कपची संभाव्य टीम


विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, अंबाती रायुडू, एमएस धोनी, ऋषभ पंत, केदार जाधव, हार्दिक पांड्या, विजय शंकर, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल/रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी


वर्ल्ड कपमधल्या भारताच्या मॅच


५ जून- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका


१३ जून- भारत विरुद्ध न्यूझीलंड


१६ जून- भारत विरुद्ध पाकिस्तान


२२ जून- भारत विरुद्ध अफगाणिस्तान


२७ जून- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज


३० जून- भारत विरुद्ध इंग्लंड


२ जुलै- भारत विरुद्ध बांगलादेश


६ जुलै- भारत विरुद्ध श्रीलंका


वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमधल्या सगळ्या मॅच या भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होतील. स्टार स्पोर्ट्सकडे वर्ल्ड कप मॅचच्या प्रसारणाचे अधिकृत अधिकार आहेत. तर मॅचचं लाईव्ह स्ट्रिमिंग हॉटस्टारवर बघता येईल.