World Cup 2019 : अनिश्चित आणि अनाकलनीय पाकिस्तान यंदा काय करणार?
५० ओव्हरच्या क्रिकेट वर्ल्ड कपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे.
मुंबई : ५० ओव्हरच्या क्रिकेट वर्ल्ड कपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या १० टीमपैकी सगळ्यात अनिश्चित आणि अनाकलनीय टीम म्हणजे पाकिस्तान. आत्तापर्यंतच्या ११ वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला फक्त एकदा १९९२ साली वर्ल्ड कप जिंकता आला आहे. नेहमीप्रमाणे यावेळीही त्यांना वर्ल्ड कप विजयाचे दावेदार मानले जात आहे.
पाकिस्तानची टीम कधी कसा खेळ करेल याचा काही नेम नाही. कधी अफलातून कामगिरी करतात तर कधी पूर्णपणे ढेपाळून जातात. यामुळे पाकिस्तानची टीम सर्वाधिक अनाकलनीय मानली जाते.
पाकिस्तानने १९७९, १९८३ आणि १९८७ विश्वचषकात उपांत्य फेरीत धडक मारली होती. इम्रान खानच्या नेतृत्त्वाखाली १९९२मध्ये त्यांना वर्ल्ड कप जिंकता आला.
१९९९ वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने फायनलमध्ये धडक मारली मात्र ऑस्ट्रेलियाकडून त्यांना पराभव पत्करावा लागला आणि त्यांना उपविजेतपदावरच समाधान मानावं लागलं.
पाकिस्तानच्या कामगिरीत सातत्य नसल्याचं अनेकदा पाहिलाय मिळाल आहे. पाकिस्तानने २०१७मध्ये इंग्लंडमध्ये झालेली चॅम्पियन्स ट्रॉ़फी पटकावली होती. तर नुकत्याच इंग्लंडमध्ये आयोजित केलेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ०-४ ने त्यांना सपाटून मार खावा लागला. यामुळे पाकिस्तानने अगदी अखेरच्या दिवशी दोन महत्त्वाचे बदल केले.
पाकिस्तानचे बॉलर सपशेल अपयशी ठरले, त्यामुळे अगदी अखेरच्या क्षणी जुनैद खान आणि फहिम अश्रफ यांच्या स्थानी मोहम्मद आमीर आणि वाहब रियाज यांचा समावेश करण्यात आलाय. तर बॅट्समन असिफ अलीलाही शेवटच्या क्षणी संधी देण्यात आली आहे.
गेल्या वर्षभरात पाकिस्तानी टीममध्ये अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. दरम्यान आता सर्फराज अहमदच्या नेतृत्त्वाखालील पाकिस्तानच्या टीममध्ये गुणवान खेळाडू आहेत. जोरदार फटकेबाजी करणारे बॅट्समन पाकिस्तानच्या गोटात आहेत.
फखर झमन आणि इमाम उल हकवर पाकिस्तानच्या सलामीची जबाबदारी असेल. असिफ अली, बाबर आझम, हॅरिस सोहेल, मोहम्मद हाफिज, सर्फराज अहमद आणि शोएब मलिकवर बॅटिंगची भिस्त असेल. इमाद वासिम आणि शादाब खान यांच्यावर पाकिस्तानच्या स्पिनची जबाबदारी असेल. हसन अली, मोहम्मद आमीर, मोहम्मद हसनैन, शाहीन आफ्रिदी आणि वहाब रियाज हा पाकिस्तानचा वेगवान तोफखाना असेल. यातील हसन अली आणि इमाद वासिम हे अष्टपैलू कामगिरी बजावणारे खेळाडू आहेत.
वेगवान बॉलिंग ही पाकिस्तान संघाची खरी ताकद आहे. त्यांच्या वेगवान माऱ्याच्या अस्त्र जर चाललं तर प्रतिस्पर्ध्यांची धुळधाण होऊ शकते. पाकिस्तान टीममधली एखाद-दुसरा खेळाडू सामन्याला कलाटणी देऊन शकतो. हेदेखील पाकिस्तानच्या खेळीच अजून एक वैशिष्ट्य आहे.
जेव्हा जेव्हा पाकिस्तान टीमकडून मोठ्या अपेक्षा ठेवल्या आहेत. तेव्हा तेव्हा त्यांनी अपेक्षाभंग केलाय. आणि जेव्हा जेव्हा त्यांच्याकडून अजिबात चांगल्या कामगिरीची अपेक्षा केलेली नसते तेव्हा ते धमाकेदार कामगिरी करता. यामुळे या अनिश्चित टीमपासून सारेच जरा सावध राहूनच खेळ करण्याची शक्यता आहे.