World Cup 2019 : पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव, भारतीय चाहत्यांचा स्टेडियममध्ये जल्लोष
वर्ल्ड कप २०१९ मध्ये पाकिस्तानचा त्यांच्या पहिल्याच मॅचमध्ये लाजीरवाणा पराभव झाला आहे.
नॉटिंगहम : वर्ल्ड कप २०१९ मध्ये पाकिस्तानचा त्यांच्या पहिल्याच मॅचमध्ये लाजीरवाणा पराभव झाला आहे. पाकिस्तानने ठेवलेलं १०६ रनचं आव्हान वेस्ट इंडिजने फक्त १३.४ ओव्हरमध्येच पूर्ण केलं. या दारुण पराभवानंतर पाकिस्तानला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.
पाकिस्तान वेस्ट इंडिजचा हा सामना बघायला काही भारतीय क्रिकेट चाहतेही गेले होते. भारताच्या या चाहत्यांनी टीम इंडियाची जर्सी घातली होती. एवढच नाही तर या चाहत्यांनी पाकिस्तानच्या पराभवानंतर स्टेडियममध्येच जल्लोष केला.
पाकिस्तानने दिलेल्या १०६ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना क्रिस गेलने ३४ बॉलमध्ये सर्वाधिक ५० रन केले. तर निकोलास पूरनने १९ बॉलमध्ये नाबाद ३४ रनची आक्रमक खेळी केली. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरने सगळ्या ३ विकेट घेतल्या.
या मॅचमध्ये वेस्ट इंडिजने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. यानंतर वेस्ट इंडिजच्या बॉलरसमोर पाकिस्तानच्या बॅट्समननी लोटांगण घातलं. वेस्ट इंडिजच्या बॉलरनी सुरुवातीपासूनच पाकिस्तानला धक्के द्यायला सुरुवात केली.
पाकिस्तानचा ओपनर फकर जमान आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या बाबर आजम याने प्रत्येकी सर्वाधिक २२ रन केल्या. वेस्ट इंडिजकडून फास्ट बॉलर ओशेन थॉमसने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर कर्णधार जेसन होल्डरला ३, आंद्रे रसेलला २ आणि शेल्डन कॉटरेलला १ विकेट मिळाली. वेस्ट इंडिजच्या फास्ट बॉलरनी पाकिस्तानच्या शॉर्ट पिच बॉल टाकून विकेट घेतल्या.