मॅन्चेस्टर : क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ची पहिली सेमी फायनल मंगळवार ९ जुलै रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या मॅचआधी विराट कोहलीने पत्रकार परिषदेमध्ये वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. पण विराटने टीमच्या बॉलिंगबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया ५ बॉलर घेऊन खेळत आहे. सेमी फायनलमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे का? चहल-कुलदीप दोघांना संधी मिळणार का?' असा प्रश्न विराटला विचारण्यात आला. यावर विराटने सरळ उत्तर दिलं नाही. 'शक्यता आहे, पण याबद्दल अजून कोणताही निर्णय झालेला नाही. याचा निर्णय टीमचं संतुलन बघून घेण्यात येईल. बॅटिंग खोल असावी म्हणून आम्ही ५ बॉलर खेळवले आहेत. आव्हानाचा पाठलाग करताना बॅटिंग खोल असणं महत्त्वाचं असतं,' असं विराट म्हणाला.


'टीम, मैदान, खेळपट्टी आणि विरुद्ध टीम यांच्यानुसार आम्ही रणनिती बनवतो. केन विलियमसनला मी याआधीही आऊट केल्याचं तुम्ही सांगितलं. मीदेखील खूप धोकादायक बॉलर आहे. आमच्यासाठी सगळे पर्याय खुले आहेत. आम्हाला टीमचं संतुलन ठेवायचं आहे आणि बॅटिंगमध्ये जास्त खोली ठेवायची आहे,' असं उत्तर विराटने दिलं.


११ वर्षांपूर्वी म्हणजेच २००८ साली भारत आणि न्यूझीलंड यांच्या टीम अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये खेळल्या होत्या. त्यावेळीही भारताचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन होता. त्या मॅचमध्ये विराटने केन विलियमसनला आऊट केलं. भारताने ती मॅच ३ विकेटने जिंकली आणि फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून वर्ल्ड कपही जिंकला.