मुंबई : वर्ल्ड कपच्या पहिल्या दोन मॅचनंतरच टीम इंडियाला मोठा धक्का लागला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये शतक झळकावणाऱ्या शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे शिखर धवन ३ आठवडे खेळू शकणार नाही, अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. याबाबत बीसीसीआय किंवा आयसीसी यांच्याकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. वर्ल्ड कप ही आयसीसीची स्पर्धा असल्यामुळे बीसीसीआयला धवनच्या बदली खेळाडूसाठी आयसीसीला विनंती करावी लागेल. आयसीसीची परवानगी मिळाल्यानंतर बदली खेळाडूची घोषणा करण्यात येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये बॅटिंग करताना धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. आता धवनऐवजी कोणाला संधी मिळणार याबाबत वेगवेगळ्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत.


ऋषभ पंत, अंबाती रायुडू, मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर हे शिखर धवनऐवजी टीममध्ये निवड होण्यासाठीचे दावेदार आहेत. हे सगळे खेळाडू ओपनर नसले तरी आता रोहित शर्मासोबत केएल राहुल ओपनिंगला येईल. आणि चौथ्या क्रमांकासाठी या खेळाडूंचा विचार होण्याची शक्यता आहे.


१५ एप्रिलला टीम इंडियाने वर्ल्ड कपसाठीच्या टीमची घोषणा केली होती. तेव्हा निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी ऋषभ पंत आणि अंबाती रायुडू यांची नावं घेतली होती. त्यामुळे या दोघांपैकी एकाचीच निवड होण्याची शक्यता जास्त आहे.


मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यर यांना इंग्लंडमध्ये भारत ए कडून खेळण्याचा अनुभव आहे. जर यांच्यापैकी एकाची निवड झाली तर ते थेट रोहित शर्मासोबत ओपनिंगला येतील. तर अजिंक्य रहाणे हा सध्या इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत आहे.


न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचपर्यंत जर शिखर धवनचा बदली खेळाडू पोहोचला नाही तर मात्र रोहित शर्मासोबत केएल राहुल ओपनिंगला खेळेल हे निश्चित आहे. मग चौथ्या क्रमांकासाठी कर्णधार विराट कोहलीकडे दिनेश कार्तिक आणि विजय शंकरचा पर्याय उपलब्ध आहे. किंवा विराट कोहली चौथ्या क्रमांकावर धोनीला खेळवून रवींद्र जडेजाचाही विचार करू शकतो. रवींद्र जडेजा हा बॅटिंग आणि बॉलिंगसोबतच चपळ फिल्डिंगही करतो.