`भारताला पराभूत करणं अशक्य नाही, फक्त...`; गिलक्रिस्टने सांगितला टीम इंडियाला हरवण्याचा फॉर्म्युला
Adam Gilchris Tips To Beat Team India In World Cup 2023: भारताने आतापर्यंत साखळीफेरीतील आपले सर्व सामने जिंकले असून 8 सामन्यांमधील विजयासहीत 16 पॉइण्ट्सहीत अव्वल स्थान पटकावलं आहे. भारताला पराभूत करणं कोणालाही जमलेलं नाही.
Adam Gilchris Tips To Beat Team India In World Cup 2023: वर्ल्ड कप 2023 स्पर्धेमधील 41 व्या सामन्यामध्ये न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धचा सामना 5 विकेट्स अन् 26.4 ओव्हर राखून सहज जिंकत सेमीफायलनमधील आपलं स्थान जवळपास निश्चित केलं आहे. न्यूझीलंडचा संघ भारताविरुद्ध सेमीफायनल खेळणार असेल तर हा सामना मुंबईत होणार आहे. भारतीय संघाचा साखळीफेरीतील केवळ नेदरलॅण्डविरुद्धचा सामना शिल्लक असून तो 14 तारखेला खेळवला जाणार आहे. या सामन्यातही भारताचा विजय निश्चित मानला जात आहे. असं झालं तर भारत साखळीफेरीत अपराजित राहून सेमीफायनल गाठणारा एकमेव संघ ठरेल. भारताला पराभूत करणं कोणालाही जमलेलं नाही. पण भारताला पराभूत करता येऊ शकतं असं ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅडम गिलक्रिस्टने म्हटलं आहे. यासाठीचा फॉर्म्युलाच गिलक्रिस्टने सांगितला आहे.
भारताला पराभूत करणं अशक्य नाही
भारतीय संघाने वर्ल्ड कप 2023 च्या आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये अभूतपूर्व कामगिरी केली आहे. त्यामुळे भारताला पराभूत करणं कोणत्याही संघाला फार आव्हानात्मक असणार आहे, असं गिलक्रिस्टने म्हटलं आहे. मात्र भारताला पराभूत करणं अशक्य नाही असंही गिलक्रिस्टने नमूद केलं आहे. भारताला पराभूत करण्यासाठी काय करावं हे सुद्धा गिलक्रिस्टने सांगितलं आहे. गिलक्रिस्टने भारताला पराभूत करण्यासाठी फलंदाजीच्या दृष्टीकोनातून काही सल्ले दिलेत.
फायनलसाठी ऑस्ट्रेलियाला दिला सल्ला
दिव्यांच्या प्रकाशात खेळताना मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे फारच धोकादायक ठरतात. त्यामुळेच भारताविरुद्ध जिंकायचं असेल तर भारताला प्रथम गोलंदाजी करु द्यावी, असं गिलक्रिस्टने म्हटलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत आमने-सामने येण्याची संधी आता फायनलमध्येच आहे. याचसंदर्भातून गिलक्रिस्टने भारताविरुद्ध खेळताना ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला तर प्रथम फलंदाजी केली पाहिजे, असं गिलक्रिस्टने म्हटलं आहे.
'टॉस जिंकल्यानंतर...'
"माझ्या मते टॉस जिंकल्यावर प्रथम फलंदाजी केली पाहिजे. भारत आतापर्यंत ज्या पद्धतीने खेळला आहे ते पाहता हेच उत्तम आहे. धावांचा पाठलाग करताना भारत कमकुवत आहे असं माझं म्हणणं नाही. विराट कोहली संघात असल्याने भारताने आतापर्यंत सर्व संघांनी दिलेल्या लक्ष्याचं यशस्वीपणे पाठलाग केला आहे. मात्र दिव्यांच्या उजेडाखाली भारतीय गोलंदाज इतर संघांसाठी अधिक घातक ठरतात. सिराज शमी आणि बुमराह फार उत्तम कामगिरी करत आहेत. उजेडामध्ये त्यांच्या गोलंदाजीवर फलंदाजी करणं तुलनेनं अधिक सोपं असेल," असं गिलक्रिस्ट म्हणाला.
भारताने योग्यवेळी...
भारताने योग्यवेळी त्यांचे फिरकी गोलंदाज हे भारतीय परिस्थितीमध्ये अधिक प्रभावी ठरतील हे हेरलं, असं गिलक्रिस्ट म्हणाला आहे. मात्र परदेशामध्ये भारताला चांगली कामगिरी करायची असेल तर वेगवान गोलंदाजीवर अधिक भर देऊन ती उत्तम करावी लागेल, असं गिलक्रिस्टने म्हटलं आहे.