24 चेंडूत 114 धावा कुटल्या! T-20 ला लाजवणारी ODI इनिंग; 30 सप्टेंबरला `तो` भारताविरुद्ध खेळणार
World Cup 2023: विरोधी संघातील सर्व खेळाडूंना एकत्र मिळून त्याने केलेल्या 182 धावांपर्यंतही मजल मारता आली नाही. 368 धावांचा पाठलाग करताना संपूर्ण संघ 181 धावांवर बाद झाला.
World Cup 2023: एकदिवसीय क्रिकेटच्या 2019 च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये इंग्लंडला जेतेपद मिळवून देण्यात मोलाचं योगदान देणाऱ्या बेन स्ट्रोक्सने बुधवारी न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. निवृत्ती मागे घेत पुनरागमन करणाऱ्या बेन स्ट्रोक्सने विक्रमी खेळी करत इंग्लंडकडून सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या उभारली. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या संघाचं नेतृत्व करणाऱ्या या फलंदाजाने न्यूझीलंडच्या गोलंदाजीची पिसं काढली. बेन स्ट्रोक्सने काही काळापूर्वीच सन्यास मागे घेत विश्वचषक स्पर्धा खेळण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्याची ही खेळी इतर संघांसाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे.
368 धावांचा डोंगर
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बेन स्ट्रोक्सची समजूत घातल्यानंतर त्याने भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वचषकाआधी न्यूझीलंडविरुद्ध खेळवल्या जात असलेल्या मालिकेमध्ये बेन स्ट्रोक्सने अवघ्या 124 चेंडूंमध्ये 182 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर इंग्लंडने 368 धावांचा डोंगर उभारला. डेव्हिड मिलान आणि बेन स्ट्रोक्स वगळता इंग्लंडच्या कोणत्याही फलंदाजाला विशेष छाप पाडता आली नाही. असं असलं तरी स्ट्रोक्सच्या फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने उभ्या केलेल्या अवाढव्य धावसंख्येच्या पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाला बेन स्ट्रोक्सने केलेल्या धावांइतक्या धावाही करता आल्या नाहीत. न्यूझीलंडचा संघ 181 धावांवर बाद झाला. इंग्लंडने हा सामना 181 धावांनी जिंकला.
अशाप्रकारे दिला डावाला आकार
बेन स्ट्रोक्सने 44 चेंडूंमध्ये 9 चौकारांच्या मदतीने 50 धावा पूर्ण केल्या. त्यानंतर मोकाट सुटलेल्या स्ट्रोक्सने आपल्या फलंदाजी कौशल्याबरोबरच ताकदीचा उत्तम मेळ घालत 76 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केलं. त्यानंतर पुढल्या 30 चेंडूंमध्ये त्याने आणखीन 4 चौकार आणि 2 षटकार लगावत 150 धावांचा टप्पा ओलांडला. बेन स्ट्रोक्सने वैयक्तिक स्तरावर सर्वात मोठी खेळी केली. यापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमधील त्याचा सर्वोत्तम स्कोअर 102 इतका होता. बेन स्ट्रोक्स एका बाजूने तुफान फटकेबाजी करत होता तर दुसऱ्या बाजूने आलेले फलंदाज टिकून राहण्याचा प्रयत्न करत होता. डेव्हिड मिलानने 96 धावांची खेळी केली. या दोघांनी मिळून 199 धावांची पार्टनरशीप केली. तर जोस बटलरबरोबर बेन स्ट्रोक्सने 76 धावांची खेळी केली. तर लियाम लिविंग्स्टोनबरोबर त्याने 46 धावांची खेळी केली.
24 चेंडूंमध्ये त्याने या 114 धावा
बेन स्ट्रोक्सने 124 चेंडूमध्ये 182 धावा करताना एकूण 15 चौकार आणि 9 षटकार लगावले. स्ट्रोक्सचा स्ट्राइक रेट हा 146.77 इतका राहिला. बेंजामीन लिस्टच्या गोलंदाजीवर विल यंगने बेन स्ट्रोक्सला झेलबाद केलं. बेन स्ट्रोक्सने त्याच्या 182 धावांपैकी 114 धावा केवळ चौकार-षटकारांनी केला. केवळ 24 चेंडूंमध्ये त्याने या 114 धावा केल्या.
भारताचा सामना इंग्लंडविरुद्ध
सर्वच स्तरातून बेन स्ट्रोक्सच्या या खेळीचं कौतुक केलं जात आहे. सध्या 4 सामन्यांच्या मालिकेमध्ये इंग्लंडने या विजयासहीत 2-1 ने आघाडी घेतील आहे. विश्वचषक सामन्याआधी भारत 2 सराव सामने खेळणार असून यापैकी पहिला सराव सामना इंग्लंडविरुद्ध गुवहाटीमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना गुवहाटीमध्ये खेळवला जाणार असून बेन स्ट्रोक्सची ही खेळी भारतीय गोलंदाजांनाही चिंतेत टाकणारी आहे हे मात्र नक्की.