World Cup 2023 Final : गुरुवारी ऑस्ट्रेलियाने आयसीसी वर्ल्डकप 2023 (CWC 2023) च्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या दक्षिण आफ्रिकेचा 3 गडी राखून पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियाने आठव्यांदा वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे आता वर्ल्डकपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (AUS vs IND) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने भारतीय संघाचे कौतुक केले आहे. भारतीय संघात कोणतीही कमतरता नाही, असे जोश हेझलवूडने (josh hazlewood) म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्डकपच्या मोठ्या सामन्यासाठी सज्ज असलेला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने महत्त्वाचं विधान केलं आहे. मला भारतीय संघात कोणतीही कमतरता दिसत नाही, असे हेझलवूडने म्हटलं आहे. चेन्नईमध्ये झालेल्या सामन्यात भारताने सहा गडी राखून विजय मिळवला होता. आता पुन्हा एकदा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. त्याआधीच जोश हेझलवूडने हे विधान केलं आहे. दरम्यान, वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी या दोन संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली होती ज्यामध्ये भारताने 2-1 ने विजय मिळवला होता.


दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयानंतर भारतासोबतच्या सामन्याबद्दल हेजलवूडने भाष्य केले आहे. "विश्वचषकापूर्वी आम्ही भारताविरुद्ध एक मालिका खेळलो होतो जी आम्ही 2-1 ने गमावली. आम्ही एकमेकांविरुद्ध भरपूर क्रिकेट खेळलो आहोत. आम्ही त्यांच्या संघाला चांगले ओळखतो आणि ते आमच्या संघालाही चांगले ओळखतात. त्यांचा संघ उत्कृष्ट आहे. त्यांच्याकडे चांगले वेगवान गोलंदाज, चांगले फिरकीपटू आणि चांगले फलंदाज आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी सर्वकाही योग्य आहे. संपूर्ण स्पर्धेत त्यांची कोणासोबतही बरोबरी नव्हती. त्यांच्या संघात कुठेही कमकुवतपणा नाही पण आम्ही रविवारी त्यांचा सामना करण्यास तयार आहोत," असे जोश हेझलवूडने म्हटलं आहे.


"जेव्हा ते चेन्नईत छोट्या लक्ष्याचा पाठलाग करत होते, तेव्हा त्यांच्या काही किरकोळ उणिवा आम्हाला कळल्या. आम्ही नशीबवान होतो की आम्हाला सुरुवातीलाच त्याच्या दोन विकेट मिळाल्या," असेही हेझलवूड म्हणाला. तसेच 'मी आणि स्टार्क बऱ्याच काळापासून एकत्र गोलंदाजी करत आहोत. आम्ही एकमेकांचा खेळ चांगल्या प्रकारे समजून घेतो आणि आम्ही दोघांनी गेल्या सामन्यात चांगली कामगिरी केली. आशा आहे की आम्ही रविवारी पुन्हा अशीच कामगिरी करू,' असेही हेझलवूडने सांगितले.


चांगल्या फॉर्मात आहे जोश हेझलवूड


जोश हेझलवूड या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत फारशा फॉर्ममध्ये दिसला नव्हता. पण त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वात चांगली गोलंदाजी केली. हेझलवूडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गोलंदाजी करताना 8 षटकांत केवळ 12 धावा देत 2 बळी घेतले. हेझलवूडने डी कॉक आणि दुसैन यांची विकेट घेतली.