रोहितचं कौतुक करताना गंभीरचा धोनी-कोहलीला टोला? म्हणाला, `कोणतंही मार्केटींग, PR...`
World Cup 2023 Gautam Gambhir Blunt Verdict: भारताने इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर गौतम गंभीरने केलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत असून त्याने आपली प्रतिक्रिया रोहितबद्दल बोलताना व्यक्त केलेली.
World Cup 2023 Gautam Gambhir Blunt Verdict: भारतीय संघ 2023 च्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत आहे. रविवारी इंग्लंडविरुद्धच्या आपल्या सामन्यामध्ये भारताने 100 धावांनी विजय मिळवला. वर्ल्ड कप 2023 मध्ये अजेय राहिलेला भारत हा एकमेव संघ आहे. भारतीय संघाच्या विजयाचं संपूर्ण श्रेय भारताची गोलंदाजी आणि सलामीवीरांच्या फलंदाजीला जाते. आतापर्यंत रोहित शर्मा आणि विराट कोहलीने धावांचे डोंगर उभारत भारतीय संघाला सहज विजय मिळवून दिले आहेत. भारतीय संघाचं सेमी फायनलमधील स्थान जवळपास निश्चित मानलं जात आहे. सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी 7 सामने जिंकणं बंधनकारक असून भारत यापासून केवळ एक विजय दूर आहे.
गंभीरने केलं रोहितचं कौतुक
भारताच्या कामगिरीबद्दल बोलताना माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने रोहित शर्मावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 2007 साली भारत पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कपचं जेतेपद पटकावलं होतं त्या संघामध्ये तसेच 2011 च्या एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्ड कप संघातही गौतम गंभीरने मोलाचं योगदान दिलं होतं. याच गंभीरने रोहितवर कौतुकाचा वर्षाव करताना, "नेतृत्व करणारा खरा लिडर हा त्याला त्याच्या टीमकडून जे हवं आहे ते स्वत: आधी करतो. तुम्हाला तुमच्या संघाकडून फलंदाजीमध्ये सकारात्मक दृष्टीकोन हवा असेल तुम्हीच ते तुमच्या कृतीमधून दाखवून दिलं पाहिजे. तुम्हीच लीडिंग फ्रॉम द फ्रण्ट म्हणतात त्याप्रमाणे नेतृत्व केलं पाहिजे. कोणत्याही प्रकारचं पब्लिक रिलेशन (जाहिरातबाजी) किंवा मार्केटींग एजन्सी तुमच्यासाठी हे करु शकत नाही," असं गौतम गंभीरने 'स्टार स्पोर्ट्स'शी बोलताना म्हटलं आहे.
इशारा कोणाकडे?
"रोहितने हेच केलं. त्याने त्याच्या कृतीमधून संघाला प्रेरणा दिली," असं गंभीरने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर हिटमॅनचं कौतुक करताना म्हटलं. गंभीरने ज्यापद्धतीचे शब्द वापरले त्यावरुन त्याचा निशाणा पूर्वी भारताचं नेतृत्व करणाऱ्या महेंद्र सिंग धोनी किंवा विराट कोहलीसारख्या खेळाडूंकडे नव्हता ना अशी शंकाही सोशल मिडियावर उपस्थित केली जात आहे. कॉमेंट्रीदरम्यान अनेकदा गंभीर कर्णधारपदाचा संदर्भ देताना एकट्या कर्णधाराला विजेतेपद पटकावता येत नाही हे अधोरेखित करतो. 2011 च्या वर्ल्ड कप विजयाचं श्रेय धोनीला देण्यावरही गंभीरने यापूर्वी अनेकदा आक्षेप घेतला आहे. त्यामुळे रविवारीही रोहितचं कौतुक करता करता गंभीरने धोनी, विराटला चिमटा काढला की काय अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु आहे.
रोहितच्या बॅटमध्ये केलेल्या धावांचा वाटा 38 टक्के
रविवारी रोहित शर्माने लखनऊ येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यामध्ये 87 धावांची खेळी केली. भारतीय संघाला 50 ओव्हरमध्ये 229 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यापैकी 87 धावा एकट्या रोहितच्या होत्या. म्हणजेच भारताने जेवढ्या धावा केल्या त्यापैकी 38 टक्के धावा एकट्या रोहितच्या बॅटमधून आल्या. भारताने इंग्लंडला वर्ल्ड कपच्या इतिहासातील त्याच्या सर्वात कमी धावसंख्येवर म्हणजेच 129 धावांवर तंबूत पाठवत सामना 100 धावांनी जिंकला. भारतीय गोलंदाजांपैकी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शामी या जोडगोळीने 7 फलंदाजांना तंबूत पाठवलं. जुसप्रीत बुमराहने 3 विकेट्स घेतल्या तर शामीने 4 विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा या फिरकीपटूंनी एकूण 3 विकेट्स घेतल्या. यापैकी 2 विकेट कुलदीप आणि 1 जडेजाने घेतली. केवळ मोहम्मद सिराजला विकेट घेता आली नाही.