भारतीय क्रिकेट संघ सध्या सर्व फॉरमॅटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. पण आयसीसीच्या क्रमवारीत संघ अव्वलस्थानी असणं भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरसाठी फार विशेष नाही. या गोष्टींचा काहीही फरक पडत नाही असं गौतम गंभीरचं म्हणणं आहे. भारतीय क्रिकेट संघामसोर वर्ल्डकप जिंकण्याचं आव्हान असताना गौतम गंभीरच्या मते वर्ल्डकप स्पर्धेत जबरदस्त रेकॉर्ड असणाऱ्या ऑस्ट्रेलियाला नमवणं भारतासाठी फार महत्त्वाचं आहे. आयसीसी वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया सर्वात यशस्वी संघ असून, स्पर्धेच्या सुरुवातीपासून त्यांना दावेदार मानलं जातं. पण गौतम गंभीरला भारत चांगली कामगिरी करेल असा विश्वास वाटत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टार स्पोर्ट्सच्या 'मिशन वर्ल्डकप' या विशेष कार्यक्रमात बोलताना गौतम गंभीरने ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करणं भारतासाठी किती महत्त्वाचं आहे याकडे लक्ष वेधलं. "मी हे नेहमीच सांगितलं आहे आणि यात कोणतीही शंका नाही की, जर तुम्हाला वर्ल्डकप जिंकायचा असेल तर ऑस्ट्रेलियाचा पराभव करावा लागेल. 2007 मध्ये आपण वर्ल्डकप जिंकलो तेव्हा सेमी फायलनमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. 2011 मध्ये आपण वर्ल्डकप जिंकलो तेव्हा क्वार्टर फायलनमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवलं होतं. कोणत्याही आयसीसी स्पर्धेत ऑस्ट्रेलिया मजबूत संघ आहे. तुम्ही रँकिंगकडे लक्ष देवू नका, त्याच्याने काही फरक पडत नाही," असं गौतम गंभीरने सांगितलं आहे. 


ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत पाचवेळा आयसीसी एकदिवसीय वर्ल्डकप जिंकला आहे. यासह ते वर्ल्डकपमधील सर्वात यशस्वी संघ ठरले आहेत. यानंतर वेस्ट इंडिज आणि भारताचा क्रमांक आहे. दोन्ही संघांनी दोनवेळा वर्ल्डकप जिंकला आहे. 2019 मधील वर्ल्डकप इंग्लंडने जिंकला होता. 


"तुम्ही रँकिंगमध्ये कोणत्याही स्थानावर असू शकता. पण जेव्हा अशा मोठ्या स्पर्धांची वेळ येते तेव्हा ऑस्ट्रेलियाकडे मोठे खेळाडू असतात. यासह त्यांच्याकडे भरपूर आत्मविश्वासही असतो. अशा मोठ्या क्षणी चांगलं खेळण्याची क्षमता ऑस्ट्रेलियाकडे आहे. भारताने जे दोन वर्ल्डकप जिंकले आहेत त्यात तुम्ही हे पाहू शकता. नॉकआऊट स्टेजमध्ये आपण दोनवेळा भारताचा पराभव केला आहे. तसंच 2015 मध्ये जो वर्ल्डकप आपण हारलो, तेव्हा ऑस्ट्रेलियाने आपला पराभव केला होता. त्यामुळे जर आपल्याला वर्ल्डकप जिंकायचा असेल, तर ऑस्ट्रेलियाविरोधातील सामना महत्त्वाचा असेल. आपला पहिलाच सामना ऑस्ट्रेलियाविरोधात होणार आहे, त्यापेक्षा चांगली गोष्ट नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पराभव करणं फार महत्त्वाचं आहे," असं गौतम गंभीरने म्हटलं आहे.


ऑस्ट्रिलेयाचा माजी खेळाडू शेन वॉट्सननेही यावेळी वर्ल्डकप कोण जिंकेल याची भविष्यवाणी केली आहे. "ऑस्ट्रेलियाकडे ज्याप्रकारचे खेळाडू आहेत ते पाहता पुन्हा ऑस्ट्रेलियाच जिंकेल. त्यांच्यासमोर काही प्रश्नचिन्ह नक्कीच आहेत. संघात काही दुखापती आहेत,. परंतु त्यांच्याकडे जे खेळाडू आहेत त्यांना मोठ्या सामन्यात कसं खेळावं याची माहिती आहे. तसंच भारत घरच्या मैदानावर खेळणार असल्याने त्यांना इतर कोणापेक्षाही स्थिती चांगली माहिती असेल. त्यांचे गोलंदाज सध्या प्रचंड फॉर्मात असून कुलदीप यादवही उत्तमोत्म कामगिरी करत आहे. त्यामुळे भारताकडेही संधी आहे. माझ्यासाठी, ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोघांमधील अंतिम सामना अविश्वसनीय असेल," असं वॉटसनने सांगितलं.