33 रनवर असताना सुटलेला कॅच नाही तर `हा` ठरला मॅचचा टर्निंग पॉइण्ट; मॅक्सवेलचाच खुलासा
World Cup 2023 Glenn Maxwell Reaction On Turning Point In Match: मॅक्सवेलने राशीद खानच्या बॉलिंगवर स्वीपचा फटका मारण्याच्या नादात उडलेला कॅच सुटल्याचा क्षण टर्निंग पॉइण्ट ठरल्याचं अनेकांचं म्हणणं असलं तरी मॅक्सवेलला हे मान्य नाही. तो नेमकं काय म्हणालाय पाहा
World Cup 2023 Glenn Maxwell Reaction On Turning Point In Match: ऑस्ट्रेलियन फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने द्विशतक झळकावत अफगाणिस्तानविरुद्धचा सामना एकहाती जिंकून दिला. मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये नाबाद 201 धावा केल्या. मॅक्सवेलने मिळवून दिलेल्या या विजयामुळे ऑस्ट्रेलिया हा वर्ल्ड कप 2023 च्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा तिसरा संघ ठरला आहे. 292 धावांचा पाठलाग करताना 91 धावांच्या आत 7 गडी बाद झालेले असताना मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स या दोघांनी अधिक पडझड न होऊ देता सामना जिंकवून दिला. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघाच्या तोंडचा विजयाचा घास मॅक्सवेलने ओढून घेतला. मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये नाबाद 201 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून द्विशतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. मॅक्सवेलच्या पायामध्ये क्रॅम्प आलेला असतानाही त्याने मैदान सोडलं नाही. मॅक्सवेल खेळणार नाही असं वाटत असतानाही तो शेवटपर्यंत मैदानावर उभा होता. सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर सामन्यातील टर्निंग पॉइण्टबद्दल मॅक्सवेलने भाष्य केलं आहे.
मुंबईतील तापमानाचा फटका
क्रॅम्पचा त्रास होऊ लागल्यानंतर मला मैदान सोडण्याचा पर्याय देण्यात आला होता. मात्र माझे पाय हलत होते म्हणून मी जमेल तसं मैदानामध्ये थांबण्याचं ठरवलं, असं मॅक्सवेल म्हणाला. तसेच मॅक्सवेलने मुंबईमधील तापमान आणि फारसा व्यायाम न केल्याचा फटका आपल्याला बसल्याचं सामन्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनदरम्यान म्हटलं. "हे भन्नाट आहे. मलाच धक्का बसला आहे," असं मॅक्सवेलने सामन्यानंतर त्याला कसं वाटतंय याबद्दल विचारलं असता सांगितलं. "आम्ही फिल्डींग करत होतो तेव्हा फार जास्त तापमान होतं. मी फार कष्ट असणारा व्यायाम ऊन्हामध्ये केला नव्हता. त्यामुळे मला त्रास झाला. शेवटपर्यंत मी मैदानात टिकून राहिलो याचं समाधान आहे," असं मॅक्सवेलने सांगितलं.
अनेकांनी आम्हाला कमी लेखलं
मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियन संघाचा वर्ल्ड कप 2023 च्या सुरुवातीचा परफॉर्मन्स पाहून अनेकांनी आम्हाला कमी लेखलं होतं असं म्हणत खंत व्यक्त केली. दक्षिण आफ्रिका आणि भारताविरुद्ध पराभूत झाल्यानंतर आम्ही सेमी फायननला जाणार नाही असं अनेक चाहते म्हणत होते. मात्र आम्ही सलग 6 सामने जिंकले, असं मॅक्सवेल म्हणाला. अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयामुळे ऑस्ट्रेलियन संघ हा भारत आणि दक्षिण आफ्रिकेनंतर सेमी फायनल्समध्ये प्रवेश करणारा तिसरा संघ ठरला आहे.
मॅक्सवेल म्हणतो, सुटलेला कॅच नाही तो टर्निंग पॉइण्ट ठरला
मॅक्सवेल 33 धावांवर खेळत असताना मुजीबने त्याचा एक सोपा झेल सोडला. सामन्यातील 20 व्या ओव्हरला राशीद खानच्या गोलंदाजीवर स्वीपचा फटका मारण्याच्या नादात बॉल मॅक्सवेलच्या बॅटला लागून मुजीबकडे गेला. मात्र त्याने एक सोपा झेल सोडला. हा सामन्यातील टर्निंग पॉइण्ट ठरल्याचं अनेकांनी म्हटलं असलं तरी मॅक्सवेलने वेगळाच क्षण टर्निंग पॉइण्ट असल्याचं म्हटलं आहे. "आम्ही फार काही प्लॅनिंग केलं नव्हतं (जेव्हा संघ 49 वर 4 बाद स्कोअरसहीत खेळत होता.) आम्ही केवळ फलंदाजी करत राहायचं असं ठरवलेलं. मी सकारात्मक विचार करुन मी गोलंदाजांविरोधात फटकेबाजी करण्याचं ठरवलं. मी केवळ बचावात्मक खेळलो असतो तर मी कदाचित लवकर बाद झालो असतो. त्या एलबीडब्ल्यूच्या अपीलनंतर मी गोलंदाजांची धुलाई करण्याचं ठरवलं," असं म्हणत मॅक्सवेलने सामन्यातील टर्निंग पॉइण्ट हाच ठरल्याचं म्हटलं.
नक्की घडलं काय?
सामन्यातील 21 व्या ओव्हरमध्ये नूर अहमदला खेळून काढताना बॉल मॅक्सवेलच्या पुढल्या पायावरील पॅडला लागला. अफगाणिस्तानी खेळाडूंच्या अपीलवर पंचांनी मॅक्सवेलला बाद घोषित केलं. रिव्ह्यूमध्ये अवघ्या काही इंचांमुळे चेंडू स्टम्पला लागत नसल्याचं समजल्यानंतर पंचांनी बाद दिल्याचा निर्णय रद्द केला आणि मॅक्सवेलला जीवनदान मिळालं. हाच टर्निंग पॉइण्ट ठरल्याचं मॅक्सवेल म्हणाला. मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स आठव्या विकेटसाठी विक्रमी पार्टनरशीप करत सामना जिंकून दिला. या विजयानंतर दोघांवरही खास करुन मॅक्सवेलवर कौतुकाचा वर्षाव होतोय.