आयसीसी एकदिवसीय वर्ल्डकप क्रिकेटमध्ये 14 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान संघ भिडणार आहेत. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी मैदानात हा सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता दोन्ही संघ आपापसात भिडणार आहेत. दोन्ही संघांनी वर्ल्डकपमधील पहिले दोन्ही सामने जिंकले असून, आपला विजयरथ पुढे नेण्याचा प्रयत्न असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्याकडे फक्त भारत आणि पाकिस्तानच नाही तर संपूर्ण जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांची उत्सुकता तर शिगेला पोहोचली आहे. हा सामना पाहण्यासाठी अहमदाबादसह संपूर्ण जगभरातील चाहते मैदानात उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. प्रेक्षकांची होणारी गर्दी लक्षात घेता अहमदाबादमधील हॉटेलची भाडी वाढवण्यात आली आहेत. तसंच हॉटेल्स पूर्ण बूक झाली असल्याने चाहत्यांनी एक दुसरा पर्याय शोधला आहे. काही प्रेक्षकांनी चेकअपच्या बहाण्याने अहमदाबादच्या रुग्णालयात थांबण्याची सोय केली आहे. 


अहमदाबाद मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष तुषार पटेल यांनी सांगितलं आहे की, "14 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये सामना होणार आहे. अशा स्थितीत हॉटेलची भाडी प्रचंड वाढली आहेत. यामुळे काही प्रेक्षकांनी रुग्णालयात थांबण्याची सोय केली आहे. हे ते प्रेक्षक आहेत जे सकाळी अहमदाबादमध्ये दाखल होतील. यानंतर ते हेल्थ चेकअप केल्यानंतर नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये दाखल होतील. सामना संपल्यानंतर रात्री ते पुन्हा रुग्णालयात थांबतील".



प्रेक्षक आरोग्य तपासणीच्या बहाण्याने रात्रभर रुग्णालयात मुक्काम ठोकण्यात आल्याचं वृत्त समोर आल्यानंतर अहमदाबाद हॉस्पिटल आणि नर्सिंग होम्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.भरत गढवी यांचं वक्तव्य समोर आलं आहे. सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी कोणत्याही रुग्णालयात राहण्याची व्यवस्था करणं योग्य नाही. रूग्णालय हे रूग्णांसाठी आणि रूग्णांच्या उपचारासाठी आहे असं ते म्हणाले आहेत. 


अहमदाबादमध्ये होणारा हा रंगतदार सामना पाहण्यासाठी अनेक नामवंत व्यक्तीही हजेरी लावणार आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, सचिन तेंडुलकर, रजनीकांत, अदर पूनावाला यांचा समावेश आहे. या सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमचे दरवाजे सकाळी १० वाजल्यापासून प्रेक्षकांसाठी उघडले जाणार आहेत. दुपारी 12.30 वाजता मैदानात मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अरिजित सिंग, सुखविंदर सिंग आणि शंकर महादेवन यावेळी कला सादर करतील. 



भारत-पाकिस्तान सामना पाहायला येणाऱ्यांसाठी गुजरात क्रिकेट असोसिएशनने एक विशेष गाईडलाइन जारी केली आहे. याअंतर्गत प्रेक्षक तिकीट, मोबाईल, चष्मा, टोपी, औषध, विना काठीचा झेंडा घेऊन मैदानात जाऊ शकतात. पण कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट, फटाके, पाण्याची बाटली, लॅपटॉप, आयपॅड, इलेक्ट्रिक सिगारेट, सॉफ्ट ड्रिंक, माचिस, लायटर, छत्री, हेल्मेट, सेल्फि स्टिक नेण्याची परवानगी नसेल. सुरक्षेसाठी 7 हजार पोलीस तैनात असणार आहे. एनएसजी आणि आरएएफसह केंद्रीय पोली दलही मैदानात तैनात असेल.