आक्रमकपणाच भारताला वर्ल्ड कपबाहेर फेकणार? दिग्गज क्रिकेटपटू म्हणाला, `ज्याप्रकारे भारत...`
World Cup 2023 Warning For Team India: भारताने वर्ल्ड कप 2023 मधील आपल्या पहिल्या 5 सामन्यांपैकी 5 ही सामने जिंकले आहेत. या स्पर्धेमध्ये पहिल्या 21 सामन्यानंतर भारत हा एकमेव अजेय संघ आहे.
World Cup 2023 Warning For Team India: भारताने वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेला अगदी स्वप्नवत सुरुवात केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आपले पहिले 5 ही सामने जिंकले आहेत. पहिल्या 21 सामन्यानंतर भारत हा एकमेव असा संघ आहे ज्याने एकही सामना गमावलेला नाही. भारताने धरमशालामध्ये झालेल्या सामन्यात न्यूझीलंडला 4 गडी राखून पराभूत केलं. तब्बल 20 वर्षानंतर भारताने वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडला पराभूत केलं. त्यापूर्वी भारताने आपल्या चौथ्या सामन्यामध्ये पुण्यात बांगलादेशला पराभूत केलं. या सामन्यात विराटने खणखणीत शतक ही झळकावलं. मात्र एकीकडे भारताच्या दमदार कामगिरीचं अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंकडून कौतुक होत असतानाच दुसरीकडे भारताच्या या सुसाट वाटचालीसंदर्भात एका एका दिग्गज क्रिकेटपटूने चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी ज्या गोष्टीकडे लक्ष वेधलं आहे त्याचा विचार चाहत्यांनीही कधी केला नसेल.
नेमकं कोण आणि काय म्हणालं?
ऑस्ट्रेलियाचे माजी विकेटकीपर इयन हॅले यांनी भारताच्या या दमदार कामगिरीबद्दल चिंता व्यक्त करताना, भारतीय संघ स्पर्धेच्या सुरुवातीलाच फार जास्त प्रमाणात ऊर्जा वाया घालवत आहे का? असा सवाल इयन हॅले यांनी उपस्थित केला आहे. स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यांमध्येच भारतीय खेळाडू अगदी जीव ओतून खेळत आहेत. अगदी अफगाणिस्तानसारख्या छोट्या संघांबरोबरही भारतीय संघ पूर्ण स्ट्रेंथने खेळला. सुरुवातीच्या सामन्यांमध्येच भारतीय संघ पूर्ण क्षमतेने आणि ऊर्जा लावून खेळत आहे याकडे इयन हॅले यांनी लक्ष वेधलं आहे. सध्या ज्या उत्साहामध्ये आणि एनर्जीने भारतीय संघ खेळत आहे ते पाहता स्पर्धा जशी पुढे जाईल त्याप्रमाणे भारतीय संघातील खेळाडूवर याचा भावनिक परिणाम होऊ शकतो अशी भीती इयन हॅले यांनी व्यक्त केली आहे.
नक्की वाचा >> 'विराटला फिनिशर म्हणू नका, 11 व्या क्रमांकाचा फलंदाजही...'; गौतमचं 'गंभीर' विधान
फार त्रास होऊ शकतो
बांगलादेशविरुद्ध भारताने विजय मिळवल्यानंतर इयन हॅले यांनी आपली चिंता बोलून दाखवली. "त्यांचा (भारतीय संघाचा) (वर्ल्ड कपमधील) प्रवास काही सहज सुरु नाही. मला भारताबद्दल एक वेगळीच भीती वाटत आहे. त्याची (कोहलीची) खेळी उत्तम होती. रोहित (शर्मा) आणि शुभमन गिल सलामीचे फलंदाज म्हणून उत्तम कामगिरी करत आहेत. मात्र तुम्ही जर नीट पाहिलं तर हे विजय मिळवण्यासाठी ते जितकी ऊर्जा वापरत आहेत ती पाहून मला अशी भीती वाटत आहे की पुढे त्यांना भावनिक दृष्ट्या फार त्रास होऊ शकतो. ते सध्याच्या सामन्यांमध्ये फारच ऊर्जा खर्च करत आहेत. माझ्यामते ते स्पर्धेच्या सुरुवातीलाच आवश्यकतेपेक्षा जास्त ताकद लावत आहेत," असं इयन हॅले यांनी 'सेन रेडिओ'शी बोलताना म्हटलं आहे.
नक्की वाचा >> हे काय भलतंच... विराट 95 वर Out झाल्याचा Video अनुष्काच्या Insta स्टोरीवर! कॅप्शन चर्चेत
माझी चिंता हीच आहे की...
"जेव्हा एखादी व्यक्ती गोलंदाजी करताना चुकीच्या पद्धतीने बॉल टाकते तेव्हा मैदानात दाखवली जाणारी इंटेसिटी आणि होणारा आरडाओरड यासारख्या गोष्टी पाहा. पुण्यामध्ये समर्थकही मोठ्या प्रमाणात हजर होते. फार सुंदर मैदान आहे हे. मात्र माझी चिंता हीच आहे की ते जास्त ताकद लावत आहेत," असं इयन हॅले म्हणाले.
भारतीय संघाला दिला हा महत्त्वाचा सल्ला
भारतीय संघाने वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेतील पुढील टप्प्यासाठी ऊर्जा राखीव ठेवावी असा सल्ला इयन हॅले यांनी दिला आहे. भारताने आपली इंटेसिटी पुढील सामन्यासाठी राखून ठेवावी एवढ्या सुरुवातीलाच अशापद्धतीने खेळण्याची गरज आपल्याला तरी वाटत नाही, असं इयन हॅले म्हणाले. "मला चिंता अशी आहे की पुढील अर्धा डझन सामने पाहिले आणि ते (भारतीय संघ) ज्या पद्धतीने खेळत आहेत ते पाहता त्यांना एनर्जीच्याबाबतीत पुढील स्तरावर जावं लागेल. ते बांगलादेशविरुद्ध खेळणार नाहीत. त्यामुळे ते ही ऊर्जा आणि इंटेसिटी नंतर (पुढील) सामन्यामध्ये वापरु शकतात," असं ऑस्ट्रेलियाच्या या माजी दिग्गज क्रिकेटपटूने म्हटलं आहे.