Anuskha Sharma Reacts As Virat Kohli Got Out On 95: भारताने न्यूझीलंडविरुद्ध सोमवारी मोहालीच्या मैदानात झालेला सामना 4 विकेट्स राखून जिंकला. मात्र या सामन्यात भारताला विजयश्री खेचून आणण्यासाठी मोलाची कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीचं शतक अवघ्या 5 धावांनी हुकलं. पुण्यातील बांगलादेशविरुद्धच्या सामन्याप्रमाणेच भारताच्या विजयासाठी आणि विराटच्या शतकासाठी समान धावांची आवश्यकता असताना विराटने षटकार लगावल्याचा प्रयत्न केला आणि तो झेलबाद झाला. विराट बाद होताच मैदानामध्ये शांतता पसरली. विराटचं शतकं झालं असतं तर त्याने सचिनच्या शतकाच्या विक्रमाची बरोबरी केली असती असं अनेकांनी या सामन्यानंतर सोशल मीडियावर म्हटलं आहे. मात्र विराटची पत्नी अनुष्का शर्माने विराट 95 वर झेलबाद झाल्याचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत एक सुंदर कॅप्शन या व्हिडीओला दिली आहे.
विराट कोहली न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये 95 धावा करुन विजयासाठी केवळ 5 धावा हव्या असताना बाद झाला. विराटने आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 48 शतकं झळकावली आहेत. विराटने अजून एक शतक केलं तर तो सचिन तेंडुलकरच्या 49 शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करेल. शतक झळकावण्यासाठी आणि भारताच्या विजयासाठीही 5 धावा हव्या असताना विराटने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू फार दूर गेला नाही आणि विराट झेलबाद झाला.
विराटने हा फटका लगावल्यानंतरच त्याच्या चेहऱ्यावर निराशा दिसून आली आणि आता आपण बाद होणार हे त्याला समजलं. झेलबाद झाल्यानंतरही विराटने मैदानामध्ये मोठ्याने ओरडून स्वत:च्या शॉट सिलेक्शनवरील संताप व्यक्त केला. विराटने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अशाच प्रकारे भारताला विजयासाठी जितक्या धावा हव्या होत्या त्याहून एक अधिक धाव शतकासाठी हवी असताना षटकार मारुन दोन्ही गोष्टी साध्य केल्या होत्या. तसाच विराटचा प्रयत्न धरमशाला येथील मैदानातही होता. मात्र यावेळेस त्याला यश आलं नाही आणि विराटबरोबर चाहत्यांचीही निराशा झाली.
नक्की वाचा >> 'विराटला फिनिशर म्हणू नका, 11 व्या क्रमांकाचा फलंदाजही...'; न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर गौतमचं 'गंभीर' विधान
विराट 95 धावांवर बाद झाल्याने चाहते निराश झाले असले तर विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने विराटला प्रोत्साहन देणारी एक पोस्ट इन्स्टाग्रामवरुन शेअर केली आहे. या पोस्टमध्ये विराट जो फटका मारुन झेलबाद झाला त्याचा 22 सेकंदांचा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ शेअर करत अनुष्काने, "कायमच तुझा अभिमान वाटतो," असं विराटला म्हटलं आहे. अनुष्काने यामध्ये हार्ट इमोजीही वापरलं आहे.
वर्ल्ड कप 2023 च्या पॉइण्ट्स टेबलबद्दल बोलायचं झालं तर भारतीय संघ 10 गुणांसहीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. या स्पर्धेत न्यूझीलंडला पहिल्यांदाच पराभवाचं तोंड पहावं लागलं होतं. न्यूझीलंडचा संघ 8 पॉइण्ट्ससहीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने न्यूझीलंडला एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये 20 वर्षानंतर पराभूत केलं.