World Cup 2023 Ind vs Pak: भारतीय क्रिकेटचा आवाज अशी ओळख असलेली काही मोजक्या नावांमध्ये हर्षा भोगले आणि रवी शास्त्रींचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. त्यातही हर्षा भोगले हे कॉमेंट्रीच्या क्षेत्रात रवी शास्त्रींचेही सिनियर आहेत. मात्र 14 ऑक्टोबर रोजी वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेत होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा लेखाजोखा हर्षा भोगलेंच्या आवाजात ऐकायला मिळणार नाही. होय हर्षा भोगले या हाय व्होल्टेज सामन्यात कॉमेंट्री करणार नाहीत. या मागील धक्कादायक कारण समोर आलं आहे.


हर्षा भोगले भारत-पाकिस्तान सामन्याला का नसणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा सालामीवीर शुभमन गीलला काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. शुभमन उपचारांसाही रुग्णालयामध्येही भरती होता. त्यामुळेच शुभमनला ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्ताविरुद्धचे वर्ल्ड कपमधील सामने खेळता आले नाहीत. मात्र डेंग्यूवर मात करुन शुभमन गील गुरुवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी अहमदाबादमध्ये दाखल झाला आणि नेटेसमध्ये त्याने सरावही केला. एकीकडे शुभमन डेंग्यूमधून सावरलेला असताना दुसरीकडे हर्षा भोगलेंना डेंग्यूचं निदान झालं आहे. यासंदर्भातील माहिती स्वत: हर्षा भोगलेंनीच आपल्या एक्स म्हणजेच ट्वीटर अकाऊंटवरुन दिली आहे.


हर्षा नेमकं काय म्हणाले?


"14 तारखेच्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात मला सहभागी होता येणार नसल्याने मी निराश झालो आहे. मला डेंग्यूची लागण झाली असून फार अशक्तपणा जाणवतोय. तसेच रोगप्रतिकारशक्तीही कमी झाल्याने मला सामन्याला उपस्थित राहून कॉमेंट्री करण शक्य होणार नाही. मला अपेक्षा आहे की 19 तारखेला होणाऱ्या सामन्यापर्यंत मी बरा होऊन कॉमेंट्रीसाठी उपलब्ध असेल. माझे सहकारी, ब्रॉडकास्टर्सची टीम या सर्वांनी मला फार मदत केली. (ऑस्ट्रेलिया आणि भारताविरुद्धच्या सामन्यात या लोकांचा वर्लडलोड मी वाढवला) या या सर्वांचे आभार मानतो," असं हर्षा भोगलेंनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन म्हटलं आहे.



भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यातच अशक्तपणा वाटू लागला अन्...


भोगलेंनी आपण अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणाऱ्या सामन्यासाठी उपलब्ध नसू असं म्हटलं आहे. 62 वर्षीय लोकप्रिय समालोचक असलेल्या हर्षा भोगलेंना भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या सामन्यातील दुसऱ्या इनिंग्सदरम्यान अशक्तपणा जाणवू लागला. त्यांनी यासंदर्भात सहकार्यांना कळवल्यानंतर त्यांना शक्य ती सर्व मदत त्यावेळेस करण्यात आली. यासाठीच त्यांनी सर्वांचे आभार मानले असून लवकरच बरा होऊन कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसेन अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 


दोन्ही संघ आतापर्यंतच्या वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत अजेय


अफगाणिस्ताविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकून भारताने पॉइण्ट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेतलेली. मात्र 24 तासांच्या आतच भारत तिसऱ्या स्थानी सरकला आहे. पाकिस्तानचा संघ टॉप 4 संघांमध्ये आहे. अव्वल चारही संघाने आपआपले पहिले दोन्ही सामने जिंकलेत. त्यामुळेच भारत आणि पाकिस्तानपैकी जो संघ हा अहमदाबादमधील सामना पराभूत होईल तो त्या संघाचा यंदाच्या वर्ल्ड कपमधील पहिला पराभव असेल.