World Cup Pakistan Vs Netherlands: आयसीसीचा या वर्षातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजेच एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वचषक स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून भारतामध्ये सुरु होत आहे. गतविजेता इंग्लंडचा संघ अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध स्पर्धेतील पहिला सामना खेळणार आहे. यापूर्वीच इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेनने बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानी संघाबद्दल एक धक्कादायक विधान केलं आहे. पाकिस्तानी संघाच्या कामगिरीमध्ये सातत्य नसल्याचं अधोरेखित करताना नासीरने हे विधान केलं आहे.


अनेक दर्जेदार खेळाडू पण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतामध्ये एकदिवसीय क्रिकेटचा वर्ल्डकप खेळवला जात असल्याने पाकिस्तान हा जेतेपदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक मानला जात आहे. मात्र आशिया चषकामध्ये पाकिस्तानच्या संघाने केलेल्या सुमार कामगिरीमुळे त्यांच्यावर कठोर टीकाही झाली होती. त्यामुळेच पाकिस्तानी संघाच्या कामगिरीबद्दल त्यांच्या चाहत्यांनाही शाश्वती नाही. बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शाहीन शाह आफ्रिदी आणि हरिस रौफसारखे दर्जेदार खेळाडू पाकिस्तानच्या संघात आहेत. या खेळाडूंमध्ये एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे.


पाकिस्तानची सुमार कामगिरी


1992 साली पाकिस्तानी संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघाने पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरलं होतं. मागील वेळेस झालेल्या एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्डकप स्पर्धेमध्ये पाकिस्तानला नावाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. मागील एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेमध्ये पाकिस्तानला उपांत्यपूर्व फेरीही गाठता आली नव्हती. त्यामुळेच यंदाच्या पार्वामध्ये कामगिरी सुधारण्याची आणि आपला प्रभाव या स्पर्धेवर टाकण्याच्या इराद्यानेच पाकिस्तानचा संघ मैदानात उतरले यात शंका नाही.


लिंबू-टिंबूकडून पराभूत झालाय पाकिस्तान


पाकिस्तानचा वर्ल्डकपमधील पहिला संघ नेदरलँडविरोधात होणार आहे. याच सामन्यासंदर्भात नासीर हुसेनने पाकिस्तानी संघ बिनभरवशाचा आहे असं म्हटलं आहे. पाकिस्तानचा संघ अनपेक्षितप्रमाणे पराभूत होतो किंवा अचानक सामना जिंकतो अशी ओळख असल्याचंही नासीर हुसेन म्हणाला आहे. अनेकदा पाकिस्तानने मोठ्या संघांना पराभूत केलं आहे. पण बऱ्याच वेळा पाकिस्तान संघ लिंबू-टिंबू संघांकडून पराभूत झाला आहे.


पाकिस्तानबद्दल नेमकं काय म्हणाला नासीर?


याच कारणामुळे नासीर हुसेनने नेदरलँडविरुद्धचा सामन्यात पाकिस्तानचा पराभव होऊ शकतो असं म्हटलं आहे. म्हणजेच वर्ल्डकप स्पर्धेची सुरुवात पराभवाने होईल अशी शक्यता नासीर हुसेनने व्यक्त केली आहे. पाकिस्तानचा पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी  हैदराबादमधील राजीव गांधी अंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. याच सामन्याबद्दल बोलताना, "मला वाटतं तो (पाकिस्तान) फार उत्तम संघ आहे. पहिल्या सामन्यामध्ये ते नेदरलँडविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. मात्र त्यात त्यांचा पराभव होऊ शकतो. पाकिस्तानचा संघ खरं तर असाच (अनपेक्षितपणे खेळणार) आहे. मात्र अचानक ते उत्तम खेळू लागतात. तुम्ही मागील टी-20 वर्ल्डकपकडे याचं उत्तम उदाहरण म्हणून पाहू शकता. ते या स्पर्धेतून बाहेर पडणार होते आणि अचानक ते थेट अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले. ते चमत्कारिक आहेत. कारण ते तशाच पद्धतीचं क्रिकेट खेळतात. नक्कीच त्यांचा खेळ पाहण्यासारखा असेल यात शंका नाही," असं हुसेनने म्हटलं आहे.