VIDEO: `पुढचा एकही सामना जिंकू नका, तेव्हाच...`; बाबरच्या चुलत्यानेच TV शोमध्ये काढली पाकिस्तानची इज्जत
World Cup 2023 : 2023 च्या विश्वचषकात पाकिस्तानी संघाची फारच वाईट अवस्था असल्याची पाहायला मिळत आहे. संघाची अवस्था पाहून खरा पाकिस्तानचा माजी क्रिकेटर कामरान अकमलने बाबर आझमच्या संघाचा अपमान केला आहे.
World Cup 2023 : कर्णधार बाबर आझमच्या (babar azam) नेतृत्वाखाली पाकिस्तान (Pakistan) संघाने मोठ्या अपेक्षेने विश्वचषक स्पर्धेत उतरला होता. सलग दोन विजयांसह पाकिस्तानने या स्पर्धेची सुरुवात केली. त्यानंतर तीन सामन्यांमध्ये पाकिस्तानला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र स्पर्धा जिंकण्यासाठी मैदातनात उतरलेला पाकिस्तानचा संघ आता विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. अशातच पाकिस्तानच्या माजी खेळाडूने (kamran akmal) पाकिस्तानच्या संघाला एकही सामना न जिंकण्याचा सल्ला दिला आहे.
आयसीसी विश्वचषकात प्रथम पाकिस्तान आणि नंतर अफगाणिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट चाहते अस्वस्थ आहेत. या पराभवानंतर बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघावर सातत्याने टीका केली जात आहे. यामध्ये आता माजी विकेटकिपर आणि फलंदाज कामरान अकमल याचाही समावेश झालाय. कामरान अकमलने पाकिस्तान संघाबाबत लाईव्ह शोमध्ये आश्चर्यकारक विधान केले आहे. कामरान अकमलने असे वक्तव्य का केले याची चर्चा आता सोशल मीडियावर सुरु झाली आहरे.
एआरवाय न्यूजवर लाईव्ह शोमध्ये कामरान अकमलने हे विधान केलं आहे. "जर पाकिस्तानच्या क्रिकेटमध्ये सुधारणा करायची असेल तर संघाने पुढील एकही सामना जिंकू नये आणि टॉप 4 मध्येही पोहोचू नये," असे अकमल म्हणाला. यावर अँकरने, तुम्हाला पाकिस्तानला जिंकताना बघायचे नाही का? असा सवाल केला. याला उत्तर देताना कामरान म्हणाला की, मला त्यांना जिंकलेले पहायचे आहे, पण पाकिस्तान क्रिकेटच्या भल्यासाठी, संघ हरला आणि आणखी बदल केले तर बरे होईल. कारण ते जिंकले तर संघाची पुन्हा तिच परिस्थिती येईल, असे कामरानने म्हटलं.
यानंतर अँकरने कामरान अकमलला थांबवले आणि पाकिस्तान क्रिकेट संघ स्पर्धेत हरताना पाहू शकत नाही, असं म्हटलं. यावर अकमलने हे मी सामना हरण्यासाठी सांगितले नाही तर अहंकार कमी करण्यासाठी आहे, असे प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानसाठी 53 कसोटी, 157 वनडे आणि 58 टी-20 खेळलेल्या कामरान अकमलच्या म्हणण्यानुसार पाकिस्तान क्रिकेटमध्ये सुधारणा होऊ शकते.
दरम्यान, पाकिस्तानच्या संघाने विश्वचषकाची सुरुवात चांगली केली होती. संघाने पहिल्या सामन्यात नेदरलँडविरुद्ध विजय मिळवला आणि दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला. मात्र, पुढच्या सामन्यात पाकिस्तानला भारताविरुद्ध दारुण पराभव पत्करावा लागला आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धही पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर संघाला अफगाणिस्तानविरुद्ध आणखी एक पराभव स्वीकारावा लागला.