`खेळाडूंना बीफ मिळालं नाही तर पाकिस्तान वर्ल्डकपचे सामने जिंकू शकणार नाही, हा भारताचा कट`
World Cup 2023 Pakistan Team Beef: पाकिस्तानी संघ भारतात दाखल झाल्यानंतर त्यांना देण्यात आलेल्या जेवणावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.
World Cup 2023 Pakistan Team Beef: आजपासून भारतामध्ये एकदिवसीय क्रिकेटचा वर्ल्डकप स्पर्धा सुरु होत आहे. 45 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये 10 संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धा सुरु होण्याच्या एक दिवस आधी सर्व संघांच्या कर्णधारांचं विशेष फोटोशूट अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडला. या कार्यक्रमामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने हैदराबादी बिर्याणीचं तोंडभरुन कौतुक केलं. ही बिर्याणी थोडी तिखट आहे पण चवीला उत्तम असल्याचं बाबर म्हणाला. खरं तर पाकिस्तानी संघ भारतात दाखल झाल्यापासूनच त्यांना देण्यात येणाऱ्या खाण्याची चर्चा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आधीच पाकिस्तानी संघाला बीफ म्हणजेच गोमांस मिळणार नाही असं स्पष्ट केलं आहे. मात्र भारतामध्ये पाकिस्तानी संघाला बीफ नाकारण्यात आल्यावरुन पाकिस्तानमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे.
बीफ न देणे हा भारताचा कट
पाकिस्तानी संघाला बीफ दिलं जाणार नाही हे ऐकल्यानंतर पाकिस्तानमधील अनेक क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. संतापलेल्या पाकिस्तानच्या काही चाहत्यांनी 'पाकिस्तानी खेळाडूंना वर्ल्डकपसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत बीफ न देणे हा भारताचा कट' असल्याचा दावा केला आहे. 'बीफ मिळालं नाही तर आपण सामने जिंकू शकणार नाही' असं अन्य एकाने म्हटलं आहे तर दुसऱ्याने 'पाकिस्तानी खेळाडूंना बीफ न मिळाल्याने त्यांच्या खेळावर परिणाम होईल,' असा दावा केला आहे. 'पाकिस्तानी संघाला बीफ न मिळाल्यास संघ कदाचित वर्ल्डकपमधून लवकर बाहेर पडेल', असा दावाही काही चाहत्यांनी केला आहे. पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
प्रोटीन पुरेश्याप्रमाणात मिळणार नाही
खरं तर पाकिस्तानमधील युट्यूबर सना अमजदने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये तिने काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत. यामध्ये पाकिस्तानी क्रिकेट चाहते कोणतेही तर्क लावत असल्याचं दिसत आहेत. 'पाकिस्तानमधील एकजण आपल्या खेळाडूंना जेवणामध्ये बीफ दिलं जात नसल्याने खेळाडूंना प्रोटीन पुरेश्याप्रमाणात मिळणार नाहीत. त्यामुळे सामना खेळताना त्यांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता येणार नाही आणि संघ जिंकणार नाही', असं सांगताना दिसत आहे.
20-25 दिवसांचा तर प्रश्न आहे
'पाकिस्तानी संघाचं भारतात ज्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं ते फारच कौतुकास्पद', असल्याचं अन्य एका चाहत्याने म्हटलं आहे. 'आपल्याला त्या ठिकाणी मिळत असलेला मानसन्मान पचवता येत नसून आपण उगाच बीफचा मुद्दा वाढवत आहोत. 20-25 दिवसांचा तर प्रश्न आहे. सध्या पाकिस्तानी संघाने सामन्यांवर लक्ष द्यावं. पाकिस्तानमध्ये आल्यानंतर आयुष्यभर बीफच खाणार आहात,' असा सल्ला एकाने पाकिस्तानी संघाला दिला आहे.
भारतात जायलाच नव्हतं पाहिजे
'पाकिस्तानचा एक चाहता पाकिस्तानी संघाने भारतात जायलाच नव्हतं पाहिजे असं म्हटलं आहे. भारताने आपल्या क्रिकेट संघाला कमजोर करण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. त्यांनी पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमधून बाहेर काढलं आहे. आपण भारतावर बहिष्कार टाकला पाहिजे,' असं ही व्यक्ती म्हणताना दिसते.