World Cup 2023 2 Bounce Ball: भारतामध्ये खेळवण्यात येत असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेआधी सर्व संघ भारतात दाखल झाले असून 29 सप्टेंबरपासून सराव सामन्यांना सुरुवात झाली आहे. पहिलाच सामना शुक्रवारी हैदाराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या संघादरम्यान खेळवण्यात आला. या सामन्यात पाकिस्तानने उत्तम फलंदाजी करत 345 धावांपर्यंत मजल मारली. पण केन विलियम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडने पाकिस्तान शेर असेल तर आपण शेरास सव्वा शेर आहोत असं दाखवत 44 व्या ओव्हरमध्ये 5 गडी राखून 345 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला. या सामन्यात अनेक रंजक गोष्टी घडल्या. त्यापैकी एक म्हणजे न्यूझीलंडचे फलंदाज बॅटीने आग ओकत असताना पडलेला 2 टप्पी बॉल.


25 व्या ओव्हरला घडला विचित्र प्रकार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानच्या बाबर आझमने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंजी करताना 345 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडमधील भारतीय वंशाच्या रचिन रविंद्रने 97 धावांची खेळी केली. त्याने कर्णधार केन विलियम्सनबरोबर 100 हून अधिक धावांची पार्टनरशीप केली. न्यूझीलंडची फलंदाजी सुरु असतानाच एक विचित्र प्रकार घडला. पाकिस्तानचा फिरकीपटू अगाह सलमान सामन्यातील 25 वी ओव्हर टाकत होता. 


नक्की वाचा >> 'पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात श्रेयस अय्यर होता अंपायर!' फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का


बॉल अगदी खेळपट्टी सोडून गेला पण...


उजव्या हाताने फिरकी गोलंदाजी करणाऱ्या अगाह सलमानने टॉम लेथॅमला एक अखूड टप्प्याचा चेंडू टाकला. हा चेंडू इतका अखूड होता की फलंदाजापर्यंत जाता जाता तो दोन वेळा टप्पी पडला. हा चेंडू अगाह सलमानच्या हातून सुटल्यासारखं प्रथमदर्शनी वाटत होतं. कारण डावखुऱ्या टॉम लेथॅमला टाकलेला हा चेंडू क्रिजपर्यंतही अगदी रडत खडत पोहोचला. त्यातही तो लेग स्टम्पच्या काय अगदी खेळपट्टीच्याही बाहेर गेला होता. सामान्यपणे असा चेंडू आला तर फलंदाज त्याला केवळ बॅट लावतात किंवा थेट हातानेच तो उचलून गोलंदाजाकडे टाकतात. मात्र टॉम लेथॅमने या चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला. 


नक्की पाहा >> पाकिस्तानच्या 'वर्ल्ड क्लास' बॉलर्सला 'थर्ड क्लास' समजून कुटणाऱ्या खेळाडूचं सचिन-राहुलशी खास नातं


फलंदाजाने घेतला पूर्ण फायदा


टॉम लेथॅमला हा चेंडू गंडल्याचं समजल्यानंतर तो अगदी चेंडूचा पाठलाग करत करत क्रिज सोडून खेळपट्टी सोडून चेंडूपर्यंत गेला आणि चेंडू सरपटण्यास सुरुवात करण्याआधी त्याने तो फाइन लेगला टोलवला. हा चेंडू नो बॉल तर देण्यात आलाच शिवाय त्यावर टॉम लेथॅमने चौकार मारल्याने तो चौकारही घोषित करण्यात आला. म्हणजे या 2 टप्पी चेंडूवर एकही अधिकृत चेंडू न मोजता न्यूझीलंडला 5 धावा मिळाल्या. घडलेला हा प्रकार स्वत: गोलंदाज अगाह सलमान आणि त्याचे सहकारी पाहत राहिले.



न्यूझीलंडचा आत्मविश्वास वाढला


न्यूझीलंडने 43.4 ओव्हरमध्येच सामना जिंकला. न्यूझीलंडने यशस्वीपणे 345 धावांचा पाठलाग केल्याने प्रत्यक्ष स्पर्धा सुरु होण्याआधी त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल यात शंका नाही. दुसरीकडे पाकिस्तानची गोलंदाजीसंदर्भातील चिंता या सामन्यानंतर अधिक वाढली आहे.