`त्यासाठी राहुल द्रविडला...`; न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी-फायलनआधीच रोहित शर्माचा शाब्दिक स्ट्रेट ड्राइव्ह
World Cup 2023 Rohit Sharma On Rahul Dravid: रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलॅण्डला पराभूत केलं.
World Cup 2023 Rohit Sharma On Rahul Dravid: न्यूझीलंडविरुद्ध मुंबईतील वानखेडेवर होत असलेल्या वर्ल्ड कप 2023 च्या पहिल्या सेमी-फायलनपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस बोलताना रोहित शर्माने भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविडचं कौतुक केलं. वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमध्ये खेळाडूंच्या पाठी उभं राहण्याचं संपूर्ण श्रेय राहुल द्रविडला जातं असं रोहितने म्हटलं आहे. रोहित शर्माला 2011 साली झालेल्या वर्ल्ड कप च्या स्पर्धेमध्ये संघात स्थान मिळालं नव्हतं. मात्र 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये राहुल द्रविडच्या प्रशिक्षणामध्ये तयार झालेल्या संघाचं नेतृत्व रोहितकडे आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने साखळी फेरीतील सर्वच्या सर्व 9 सामने जिंकले असून यापैकी बहुतांश विजय हे एकतर्फी आहेत.
न्यूझीलंडच्या संघाचं कौतुक
रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलॅण्डला पराभूत केलं. आज भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी-फायलनच्या सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. या सामन्याआधीच्या पूर्वसंख्येला रोहित शर्माने पत्रकारांशी संवाद साधला. रोहित शर्माने न्यूझीलंडच्या संघाचं कौतुक करताना हा संघ फारच सातत्यपूर्ण आणि संयमी कामगिरी करत असून फार शिस्त या संघाला आहे, असं म्हटलं आहे. 2019 मध्ये ओल्ड ट्रॉफोर्डच्या मैदानावर विल्यमसनच्या नेतृत्वाखालील संघाने भारताला वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला होता. मात्र अंतिम सामन्यामध्ये इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत केलं होतं.
दोन्ही खेळाडूंची दमदार कामगिरी
या पत्रकार परिषदेमध्ये रोहित शर्माने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा आवर्जून उल्लेख केला. राहुल द्रविडचा संघातील खेळाडूंना मोठा आधार वाटतो. बराच काळ दुखापतींमुळे संघामधून बाहेर असलेले खेळाडू वर्ल्ड कपच्या संघामध्ये आल्यानंतर द्रविडने त्यांना उत्तम मार्गदर्शन केल्याचं रोहित म्हणाला. वर्ल्ड कपमधील भारतीय फलंदाजीच्या मधल्या फळीचा कणा असलेले के. एल. राहुल आणि श्रेयस अय्यर हे दोघेही मैदानापासून दूर होते. भारतीय निवड समितीने श्रेयसला मधली फळी भक्कम करण्याच्या दृष्टीने संधी दिली. तर के. एल. राहुलला ही बऱ्याच काळानंतर संघात स्थान देण्यात आलं. नेदरलॅण्डविरुद्ध रविवारी झालेल्या सामन्यात श्रेयस आणि राहुलने 208 धावांची पार्टनरशीप केली.
...म्हणून द्रविडला श्रेय दिलं पाहिजे
"माझ्याकडे कोणताही मंत्र नाही. एक कर्णधार म्हणून तुम्हाला असा खेळ करायचा आहे हे एकदा ठरलं की त्याबद्दल तुमच्या मनात अधिक स्पष्टता हवी. तुम्ही खेळाडूंच्या पाठीशी उभं राहायला हवं. काही खेळाडूंवर विशेष जबाबदारी सोपवली असेल तर आपण त्यांना पाठिंबा द्यायला हवा. आम्ही खेळाडूंच्या पाठीशी आहोत आणि कायम राहू हे त्यांनाही वाटलं पाहिजे. त्यासाठी राहुल द्रविडला आपण श्रेय देणं गरजेचं आहे कारण म्हणावे तसे निकाल मिळत नसतानाही त्यांनी (राहुल द्रविडने) संघात फार बदल केले नाहीत. आम्ही भविष्यातही हेच करणार आहोत. सर्व खेळाडूंच्या भूमिका स्पष्ट हव्यात आणि खेळाडूंना स्वातंत्र्य मिळायला हवं. एका क्षणी तर आम्ही चौघांनी (नियमित गोलंदाज नसलेल्यांनी) गोलंदाजी केली आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरुन दाद दिली," असं रोहित म्हणाला.