भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी वानखेडे मैदानात श्रीलंकेचा पराभव करत वर्ल्डकपमधील आपल्या सलग सातव्या विजयाची नोंद केली आहे. भारताने श्रीलंकेचा 302 धावांनी पराभव वर्ल्डकपमधील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. या सामन्यात शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने तुफान फटकेबाजी केली. दरम्यान मैदानात आक्रमक खेळी करणारा श्रेयस अय्यर सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेतही आक्रमक दिसला. पत्रकाराने श्रेयस अय्यरला बाऊन्सर खेळताना अडखळताना दिसतोस असं विचारलं असता तो काहीसा संतापला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्रकाराने श्रेयस अय्यरला विचारलं की, 'वर्ल्डकप सुरु झाल्यापासून शॉर्ट बॉल ही तुझ्यासाठी एक समस्या ठरत आहे. पण आज आम्ही काही चांगले पूल शॉट पाहिले. आता पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेविरोधात असून ते शॉर्ट बॉल किती चांगले टाकतात याची आपल्याला कल्पना आहे. अशा स्थितीत तू कशाप्रकारे तयारी केली आहेस'. यावर श्रेयस अय्यरने त्याला जेव्हा तुम्ही समस्या म्हणता तेव्हा नक्की काय म्हणायचं असतं? असा प्रतिप्रश्न केला. त्यावर पत्रकारानेही सावरत समस्या नाही, पण त्रास देतात असं म्हणायचं आहे असं म्हटलं. 


यानंतर श्रेयस अय्यरने यावर सविस्तर उत्तर देताना खंत आणि संताप व्यक्त केला. तो म्हणाला की, "मला त्रास देतात? तू मला पूल शॉट्स खेळताना पाहिलं आहेस का? खासकरुन जे सीमेपार जातात. जेव्हा तुम्ही चेंडू टोलवत असता तेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारे आऊट होण्याची शक्यता असते. मग तो चेंडू शॉर्ट असो किंवा ओव्हरपीच असो. जर मी दोन ते तीन वेळा बोल्ड झालो तर मग तुम्ही म्हणाल की याला स्विंग बॉल खेळता येत नाही". 



"त्यामुळे फलंदाज कोणत्याही चेंडूवर बाद होऊ शकतो. तुम्ही लोकांनीच मी शॉर्ट बॉलवर खेळू शकत नाही असं वातावरण निर्माण केलं आहे. आणि मग लोकही ही चर्चा करु लागतात. यानंतर तुमच्याही डोक्यात हा विचार फिरत राहतो आणि तुम्ही त्यावर काम करत राहता," असं श्रेयस अय्यरने सांगितलं.


"इतर मैदानांच्या तुलनेत वानखेडे मैदानात चेंडू जास्त उसळतो. मी येथे खूप खेळलो असल्याने त्यांचा सामना कसा करायचा याची मला जाणीव आहे. हे शॉट खेळताना कधी तुम्हाला यश मिळतं तर कधी आऊट होता. पण अनेकदा माझ्यासाठी तो शॉट अपयशी ठरला आहे. त्यामुळे कदाचित तुम्हाला ती समस्या वाटत आहे. पण माझ्यासाठी ती समस्या नाही," असं श्रेयस अय्यर म्हणाला आहे. 


श्रेयस अय्यरने यावेळी पाठीच्या दुखापतीमुळे आपल्याला फार अडचणींचा सामना करावा लागल्याचं मान्य केलं. दुखापतीमुळे श्रेयस अय्यर 6 महिने संघाबाहेर होता. त्याच्यावर सर्जरीही करण्यात आली होती. "दुखापतीमधून बाहेर येणं माझ्यासाठी फार कठीण होतं. खासकरुन क्षेत्ररक्षण करताना मी आधीसारखी हालचाल करु शकत नाही. पण ट्रेनर आणि फिजिओनी माझ्यावर फार मेहनत घेतली आहे. 50 ओव्हर्समध्ये तुमच्या शरिराची प्रचंड हालचाल होत असते," असं श्रेयस अय्यरने सांगितलं