श्रीलंकेविरोधात 92 धावांची खेळी केल्यानंतर भारतीय फलंदाज शुभमन गिलने धक्कादायक खुलासा केला आहे. डेंग्यूनंतर आपण अद्याप पूर्णपणे फिट झालो नसल्याचा खुलासा शुभमन गिलने केला आहे. वर्ल्डकप स्पर्धा सुरु होण्याच्या काही दिवस आधीच शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाली होती. यामुळे पहिल्या दोन सामन्यांना तो मुकला होता. भारताने श्रीलंकेचा 302 धावांनी पराभव केला. या विजयानंतर बोलताना शुभमन गिलने खुलासा केला की, "मी अद्याप पूर्णपणे फिट नाही. डेंग्यूनंतर माझे वजन 4 कमी झालं आहे. स्नायूंचं वजन अद्याप भरुन आलेलं नाही". 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान शुभमनने आपण खेळताना अद्यापही त्याच प्रकारे समोरील संघावर दबाव आणण्याच्या हेतून खेळत असल्याचं सांगितलं. "चेंडू हा फिरत होता आणि मी मला हवं त्या ठिकाणी तो टोलवत होतो. मी गोलंदाजांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतो. अखेरचा सामना वगळता मागील सामन्यांमध्ये मला चांगली सुरुवात मिळाली होती. आम्ही सतत स्ट्राइक बदलण्याचा विचार केला. मला वाटत नाही की या खेळपट्टीवर 400 धावा होऊ शकतात. आम्ही चांगली फलंदाजी केली आणि 350 धावा केल्या," असं शुभमन गिलने सांगितलं.


शुभमन गिलने यावेळी भारतीय गोलंदाज आणि श्रेयस अय्यरचं कौतुक केलं. "आमचे गोलंदाज ज्याप्रकारे गोलंदाजी करत होते, त्यावरुन विकेट मिळणार याचा अंदाज होता. मोहम्मद सिराज तर नेहमीच जबरदस्त खेळतो. ते कमाल आहेत. त्यांनी आमचं काम खूप सोपं केलं आहे. आज श्रेयस अय्यरने महत्त्वाची खेळी केली. त्याने फार जबरदस्त फलंदाजी केली," असं शुभमन म्हणाला.


या सामन्यात मोहम्मद शमीला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मोहम्मद शमीने या सामन्यात 5 विकेट घेत, वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. "तुम्ही योग्य जागी चेंडू टाकणं महत्त्वाचं असतं," असं त्याने सांगितलं आहे. 


"आम्ही ज्याप्रकारे गोलंदाजी करत आहोत ते पाहून सर्वांना आनंद होत असून, प्रत्येकजण एकमेकांचं यश साजरं करत आहे. आम्ही एक युनिट म्हणून गोलंदाजी करत असून त्यामुळेच हे निकाल दिसत आहेत," असं मोहम्मद शमी म्हणाला. मोठ्या सामन्यांमध्ये जर तुम्ही लय गमावली तर ती पुन्हा मिळणं कठीण असतं असंही त्याने सांगितलं. 


श्रीलंकेचा कर्णधार कुशल मेंडिस याने पराभवानंतर नाराजी जाहीर केली आहे. मी संघाच्या आणि स्वत:च्या कामगिरीवर नाराज आहे. भारताने फार चांगली गोलंदाजी केली. आम्ही विराट आणि शुभमन गिल यांना जीवनदान देणं महागात पडलं आहे. अनेकदा हे क्षण संपूर्ण चित्र पलटतात. आमचे अजून दोन सामने शिल्लक असून, पुनरागमन करु अशी आशा आहे असं त्याने म्हटलं आहे.