ऑस्ट्रेलिया अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने संघाला एकहाती वर्ल्डकपच्या सेमी-फायनलमध्ये नेलं आहे. अफगाणिस्तानने दिलेल्या 293 धावांचं आव्हान पूर्ण करताना एकट्या मॅक्सवेलने 201 धावा कुटल्या. ऑस्ट्रेलिया संघ एकावेळी 91 धावांवर 7 गडी बाद असताना कर्णधार पॅट कमिन्स मैदानात मॅक्सवेलच्या जोडीला उतरला होता. अफगाणिस्तान संघ ऑस्ट्रेलियाचा पराभव करत वर्ल्डकपमधील आणखी एका धक्कादायक निकालाची नोंद करणार असं वाटत असताना मॅक्सवेल नावाचं वादळ पाय घट्ट रोवून उभं होतं. पायात क्रॅम्प आलेले असतानाही मॅक्सवेल मैदानात थांबला आणि 21 चौकार, 10 षटकार ठोकले. दुसरीकडे पॅट कमिन्सने 68 चेंडूत फक्त 12 धावा करत एका बाजूने विकेट वाचवली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान या सामन्यावर बोलताना भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी जखमी मॅक्सवेलसाठी फलंदाजी करणं फारच सोपं केलं होतं अशी टीका केली. "अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी मॅक्सवेलला सरळ चेंडू टाकले. मॅक्सवेल जखमी असताना त्यांनी सातव्या स्टम्पला चेंडू टाकायला हवे होते, म्हणजे तो चेंडूपर्यंत पोहोचू शकला नसता," असं सौरभ गांगुलीने कोलकाता टीव्हीशी बोलताना म्हटलं. 


दरम्यान ऑस्ट्रेलिया संघ 91 वर 7 विकेट अशा स्थितीत असताना अफगाणिस्तानचे गोलंदाज संधीचा फायदा घेण्यात असमर्थ ठरले अशी टीका करताना गांगुलीने मॅक्सवलेची खेळी महान होती हेदेखील मान्य केलं आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील महान खेळींमध्ये याची गणना होते असं गांगुलीने सांगितलं आहे. 


"अजय जडेजा कदाचित रडत असेल. त्यांनी पॅडवर फारच चेंडू टाकले. मॅक्सवेल फक्त एका जागेवर उभा राहून मारत होता. त्यांनी वाईडला चेंडू टाकायला  हवे होते. पण मला मॅक्सवेलने चांगली कामगिरी केली हे नाकारायचं नाही. एकदिवसीय क्रिकेटमधील ती एक महान खेळी होती," असं गांगुली म्हणाला.


पाचवेळा वर्ल्डकप चॅम्पियन राहिलेला ऑस्ट्रेलिया संघ आता गुरुवारी सेमी-फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. पहिल्या दोन सामन्यात पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलिया संघाने नंतर सलग 6 सामने जिंकले आहेत.