World Cup 2023 Shardul Thakur: वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत भारतीय संघाने आपले सर्वच्या सर्व सामने जिंकले आहेत. भारताने बांगलादेशविरुद्धचा सामना 7 विकेट्सने जिंकला. या सामन्यात शार्दुल ठाकूरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली होती. बांगलादेशविरुद्धच्या सामन्याआधी मोहम्मद शामीला संघात स्थान मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र असं काहीही घडलं नाही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील विजेता संघ भारताने कायम ठेवला. यामुळेच शार्दुल ठाकूरलाही संघात स्थान मिळालं. मात्र शार्दुल ठाकूरला संघात स्थान देण्यात आल्याबद्दल एका माजी क्रिकेटपटूने कठोर शब्दांमध्ये टीकास्त्र सोडलं आहे.


त्याला कर्नाटकच्या संघातही कोणी घेणार नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचे माजी गोलंदाज डोडा गणेश यांनी शार्दुल ठाकूरला वारंवार भारतीय संघात संधी मिळत असल्याच्या मुद्द्यावरुन आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. डोडा गणेश यांनी सोशल मीडियावरुन आपली भूमिका मांडली असून त्यांची पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. शार्दुल ठाकूरची कामगिरी ही त्याला कर्नाटकच्या संघात घेण्यासारखीही नसल्याचं डोडा गणेश म्हणाले आहेत. एक्सवर (पूर्वीचं ट्वीटर) केलेल्या पोस्टमध्ये डोडा गणेश यांनी, "शार्दुल ठाकूरबद्दल माझ्या मनात फार सन्मान आहे. मात्र आपल्या गोलंदाजीच्या जोरावर त्याला कर्नाटकच्या संघांमध्येही स्थान मिळवण्यासाठीही संघर्ष करावा लागेल. भारतीय संघांतील त्याच्या समावेशाबद्दल न बोललेलं बरं," असा टोला लगावला आहे.



छाप पाडण्यात अपयशी


भारत आणि बांगलादेशदरम्यानच्या सामन्याआधी जेव्हा शार्दुलची निवड संघात करण्यात आली तेव्हाच्या आकडेवारीनुसार त्याने 47 एकदिवसीय सामन्यांमध्ये 64 बळी घेतले आहेत. फलंदाजी करताना त्याने 329 धावा केल्या आहेत. अष्टपैलू खेळाडू म्हणून शार्दुल ठाकूरला संघात संधी मिळाली आहे. मात्र शार्दुलला आपल्या कामगिरीने अद्याप वर्ल्ड कप 2023 मध्ये छाप पाडण्यात यश आलेलं नाही. त्यामुळेच त्याच्याऐवजी इतर खेळाडूंना संघात संधी देता येईल या अर्थाने माजी खेळाडूंकडून टीका केली जात आहे.


संघ व्यवस्थापनावर टीका


शार्दुल ठाकूरला वर्ल्ड कपमध्ये अद्याप फलंदाजीची संधी मिळाली नाही. दुसरीकडे शार्दुलसारखा खेळाडू संघात असताना मोहम्मद शामी आणि आर. अश्वीनसारखे दिग्गज खेळाडूंना संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे. त्यामुळेच या माजी क्रिकेटपटूने शार्दुलच्या सामावेशावरुन संघ व्यवस्थापनावर टीका केली आहे. 


इतर खेळाडूंना त्याच्याऐवजी संधी देण्याची मागणी


बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शार्दुल ठाकूरने 9 ओव्हरमध्ये 59 धावा देत 1 विकेट घेतली. भारतीय संघामध्ये शार्दुलऐवजी सूर्युकुमार यादव आणि इतर खेळाडूंना संधी देता येईल असं यापूर्वी अनेक माजी क्रिकेटपटूंनी म्हटलं आहे. एवढे दमदार फलंदाज असताना अगदी आठव्या क्रमाकांपर्यंत शार्दुलच्या रुपात अष्टपैलू खेळाडू संघात ठेवण्यात काय अर्थ आहे असा प्रश्नही अनेकांनी यापूर्वी विचारला आहे.