Ind vs Pak: `मित्रा तू सर्वात मोठा...`, सचिन तेंडुलकरने खिल्ली उडवल्यानंतर शोएब अख्तरने दिलं उत्तर
भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर सचिन तेंडुलकरने एक्सवर शोएब अख्तरला ट्रोल केलं होतं. यानंतर शोएब अख्तरनेही त्यावर उत्तर दिलं आहे.
एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ भिडण्यापूर्वी शोएब अख्तरने संघाचं मनोबल वाढवण्यासाठी एक पोस्ट शेअर केली होती. एक्सवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तो सचिन तेंडुलकरला बाद केल्यानंतर सेलिब्रेशन करताना दिसत होता. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तसंच अनेक दिग्गज खेळाडूही त्यावर व्यक्त केली होती. पण जेव्हा भारताने पाकिस्तानचा पराभव केला तेव्हा सचिन तेंडुलकरने या पोस्टवर व्यक्त होत शोएब अख्तरला ट्रोल केलं होतं. यानंतर सचिनचं हे उत्तरही व्हायरल झालं होतं. दरम्यान, सचिनने खिल्ली उडवल्यानंतर शोएब अख्तरने त्याला उत्तर दिलं आहे.
शोएब अख्तरने काय पोस्ट केलं होतं?
शोएब अख्तरने भारत-पाकिस्तान सामन्याआधी एक्सवर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने सचिनच्या विकेटनंतर सेलिब्रेशन करतानाचा फोटोही जोडला होता. 'उद्या जर असं काही करायचं असेल तर शांत राहा', असा सल्ला त्याने संघाला दिला होता.
सचिन तेंडुलकरने केलं ट्रोल
भारताने या सामन्यात पाकिस्तानचा 7 गडी राखत मोठा पराभव केला. यानंतर सचिन तेंडुलकरने या पोस्टवर प्रतिक्रिया देत शोएब अख्तरलाच ट्रोल केलं. "माझ्या मित्रा, तू दिलेल्या सल्ल्याचं पालन केलं आणि सगळं काही एकदम शांत ठेवलं," अशा शब्दांत सचिनने त्याची खिल्ली उडवली.
शोएब अख्तर झाला व्यक्त
सचिनने शोएबच्या पोस्टवर दिलेल्या प्रतिक्रियेचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. त्याची पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. यादरम्यान शोएब अख्तरही त्यावर व्यक्त झाला आहे. "माझ्या मित्रा, तू या खेळाला गवसणी घालणारा सर्वकालीन महान खेळाडू आहेस आणि त्याचा सर्वात मोठा राजदूत आहेस. आपली ही मैत्रीपूर्ण गंमत हे निश्चितपणे बदलणार नाही," असं शोएब अख्तरने म्हटलं आहे.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये झालेल्या सामन्यात भारताने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान प्रथम फलंदाजी करताना पूर्ण 50 ओव्हरही खेळू शकला नाही. 155 धावांवर 2 बाद नंतर पाकिस्तान संघ 191 धावांवर गारद झाला. भारताने अत्यंत सहजपणे या लक्ष्याचा पाठलाग केला. कर्णधार रोहित शर्माने 86 धावांची जबरदस्त खेळी करत भारताच्या विजयाचा पाया रोवला. भारताने 7 गडी राखून हा सामना जिंकला.
एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत 7 वेळा भारत-पाकिस्तान संघ एकमेकांशी भिडले असून सर्व सामने भारताने जिंकले आहेत. नरेंद्र मोदी स्टेडिअममधील सामन्यात पाकिस्तान संघ हा नकोसा रेकॉर्ड मोडेल अशी त्यांच्या चाहत्यांना अपेक्षा होती. पण पुन्हा एकदा पाकिस्तान संघ अपयशी ठरला असून आता रेकॉर्ड 8-0 असा झाला आहे.