मुंबईतील खराब हवामानाचा चाहत्यांना बसणार फटका! BCCI ने भारत Vs श्रीलंका सामन्याआधी घेतला मोठा निर्णय
India Vs Sri Lanka: मुंबईतील हवेचा दर्जा घसरला आहे. गुरुवारी मुंबईतील वानखेडे स्टॅडियममध्ये भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सामना खेळवला जात आहे.
India Vs Sri Lanka: भारतात विश्वचषकाचे वारे वाहत आहे. विश्वचषक स्पर्धेत आत्तापर्यंत भारत सहा सामने खेळला आणि सहाही सामन्यांत विजय मिळवला आहे. गुरुवारी वानखेडे स्डेडियममध्ये भारताचा सामना श्रीलंकेसोबत होणार आहे. मात्र, त्याआधीच BCCIने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील वाढते प्रदुषण आणि ढासळणारी हवेची गुणवत्ता यामुळं BCCIने मुंबई आणि दिल्लीत होणाऱ्या सामन्यांसाठी एक निर्णय घेतला आहे.
सामना झाल्यानंतर व विजयानंतर मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिशबाजी करण्यात येते. ही आतिषबाजी पाहण्यासारखी असते. स्टेडियममधले प्रेक्षकही मोठ्या उत्साहात असतात. मात्र आता मुंबई आणि दिल्लीत BCCI स्टेडियममध्ये आतिषबाजी न करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी वानखेडे स्टेडियम आणि सोमवारी फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये आता फटाक्यांची आतिषबाजी होणार नाहीये.
BCCIचे सचिव जय शाह यांनी इंडियन एक्स्प्रेससोबत झालेल्या मुलाखतीत या वृत्तावर स्पष्टीकरण दिलं आहे. मी प्रामुख्याने हा मुद्दा ICCसमोर उपस्थित केला आहे. मुंबई आणि दिल्लीत कोणत्याही प्रकारे आतिषबाजी केली जाणार नाही. प्रदूषणाचा स्तर खालावत असताना बोर्डाने पर्यावरणासंबंधी मुद्दा उपस्थित केला आहे. नागरिकांमध्ये वाढते प्रदूषण आणि पर्यायावरणासंबंधी जागरुकता वाढवण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे, त्यासाठीच का निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत आहे. मुंबईतील एकाही भागात हवेची गुणवत्ता चांगली नाहीये. शहरात वाढलेल्या प्रदुषणामुळं नागरिकांना श्वसनाचे व श्वसनविकार जडण्याचे प्रमाण वाढत आहे. श्वास घेण्यास त्रास होत आहे. शहरात जवळपास पावणे दोन कोटी जनता असून त्यांचे आरोग्य धोक्यात आहे. दरम्यान, मुंबईतील प्रदुषित हवेचा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयातही उपस्थित करण्यात आला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कोणते उपाय योजले आहेत, असं प्रश्न हायकोर्टाने केला आहे.
रोहित शर्माची पोस्टही चर्चेत
मुंबईतील हवेची स्थिती दर्शवणारा एक फोटो टिम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने शेअर केला होता. रोहित शर्माने विमानातून हा फोटो काढला होता. त्यात मुंबईवर धुरक्याची चादर पसरलेली दिसत आहे. हवेमुळं मुंबई स्पष्टही दिसत नाही. हाच फोटो शेअर करत रोहितने लिहिलं आहे की, मुंबई हे काय झालं.