`बांगलादेशची मैदानात गलिच्छ वर्तणूक`, कर्णधार प्रियम गर्ग संतापला
बांगलादेशच्या खेळाडूंचा विजयानंतर मैदानात उन्माद
पॉचफेस्टरूम : अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशचा ऐतिहासिक विजय झाला. आयसीसीची स्पर्धा जिंकण्याची बांगलादेशची ही पहिलीच वेळ आहे. फायनल मॅचमध्ये बांगलादेशने भारताचा ३ विकेटने पराभव केला. या कामगिरीनंतर बांगलादेशच्या खेळाडूंचा उद्दामपणा पाहायला मिळाला.
विजयी रन मारल्यानंतर बांगलादेशचे खेळाडू मैदानात आले आणि जल्लोष करायला लागले. हा जल्लोष करत असताना बांगलादेशच्या खेळाडूंनी भारतीय खेळाडूंबाबत काही वक्तव्यं केली. यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये बाचाबाची व्हायला सुरुवात झाली.
'खेळामध्ये या गोष्टी होतच असतात. काही वेळा तुमचा पराभव होतो, तर काही वेळा तुम्ही जिंकता. पण त्यांची प्रतिक्रिया गलिच्छ होती. या गोष्टी घडायला नको होत्या,' असं भारताचा कर्णधार प्रियम गर्ग म्हणाला.
बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने या गोष्टी दुर्भाग्यपूर्ण असल्याचं सांगितलं. तसंच त्याने खेळाडूंच्या वागण्यावर खेद व्यक्त केला. या गोष्टी घडायला नको होत्या. प्रतिस्पर्धी टीमचा आणि खेळाचा आम्ही आदर केलाच पाहिजे, असं अकबर अली म्हणाला.
नेमकं काय झालं?
मॅच संपल्यानंतर बांगलादेशचे खेळाडू मैदानात पोहोचले. मैदानात आल्यानंतर बांगलादेशचा एक खेळाडू भारतीय खेळाडूसमोर उभा राहिला. बांगलादेशच्या या खेळाडूने भडकाऊ वक्तव्यं केली, यानंतर भारतीय खेळाडूंनी त्याला लांब केलं वाद वाढल्यानंतर अंपायर मध्यस्ती करायला आले, अशी माहिती आहे.
वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये बांगलादेशच्या बॉलरनी उल्लेखनीय कामगिरी करत भारताला १७७ रनवर ऑल आऊट केलं. यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ८८ रनची खेळी केली. भारताच्या शेवटच्या ७ विकेट फक्त २२ रनवर गेल्या. भारताच्या या आव्हानाचा पाठलाग बांगलादेशने ४२.१ ओव्हरमध्ये १७० रन करून पूर्ण केला. पावसामुळे बांगलादेशला विजयासाठी ४६ ओव्हरमध्ये १७० रनचं आव्हान मिळालं होतं.