ऑस्ट्रेलियावर नामुष्की, लागोपाठ ७ वनडेमध्ये पराभव
एकेकाळची विश्वविजेती टीम असलेल्या ऑस्ट्रेलियाला आता काय होतीस तू, काय झालीस तू? असं म्हणण्याची वेळ आली आहे.
पर्थ : एकेकाळची विश्वविजेती टीम असलेल्या ऑस्ट्रेलियाला आता काय होतीस तू, काय झालीस तू? असं म्हणण्याची वेळ आली आहे. लागोपाठ ७ वनडेमध्ये पराभव पत्करावा लागण्याची नामुष्की ऑस्ट्रेलियाच्या टीमवर ओढावली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाचा ६ विकेटनं पराभव झाला आहे. लागोपाठ ७ वनडे गमावण्याची ऑस्ट्रेलियाची ही पहिलीच वेळ आहे. यावर्षाच्या सुरुवातीलाच इंग्लंडनं पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. यानंतर ऑस्ट्रेलिया इंग्लंडच्या दौऱ्यावर गेली. या दौऱ्यातल्या सगळ्या ५ मॅचमध्ये कांगारूंना पराभव पत्करावा लागला. यानंतर आता दक्षिण आफ्रिकेनं त्यांना लोळवलं.
याआधी ७ सप्टेंबर १९९६ ते ३ नोव्हेंबर १९९६ या कालावधीमध्ये ऑस्ट्रेलियानं लागोपाठ ६ वनडे मॅच हारल्या होत्या. ऑस्ट्रेलियाची एकेकाळची ओळख ही जगज्जेती टीम अशी होती. क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक ५ वेळा ऑस्ट्रेलियानं वर्ल्ड कप जिंकले आहेत. यातल्या ३ वर्ल्ड कपवर तर कांगारूंनी लागोपाठ नाव कोरलं होतं. पण आता मात्र ऑस्ट्रेलियाच्या नावावर सगळ्यात खराब रेकॉर्डची नोंद झाली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या बॉलरनी सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाला धक्के दिले आणि त्यांची टीम १५२ रनवर ऑल आऊट झाली. या मॅचमधून दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फास्ट बॉलर डेल स्टेननं शानदार पुनरागमन केलं. स्टेननं ७ ओव्हरमध्ये फक्त १८ रन देऊन २ विकेट घेतल्या. तर पेहलुक्वायोला सर्वाधिक ३ विकेट मिळाल्या. लुंगी एनगीडी आणि इम्रान ताहीरला प्रत्येकी २-२ विकेट घेण्यात यश आलं.
ऑस्ट्रेलियाकडून नवव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या नॅथन कुल्टर नाईलनं सर्वाधिक ३४ रन केले. ऑस्ट्रेलियानं ठेवलेल्या १५३ रनचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचे ओपनर क्विंटन डीकॉक(४७ रन) आणि रीझा हेन्ड्रीक्स(४४ रन) यांनी दक्षिण आफ्रिकेला ९४ रनची सुरुवात करून दिली. या दोघांच्या चांगल्या सुरुवातीमुळे दक्षिण आफ्रिकेचा विजय सोपा झाला. भेदक बॉलिंग करून ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगला खिंडार पाडणाऱ्या डेल स्टेनला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. ३ वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिका १-०नं आघाडीवर आहे.