मुंबई: 23 वर्षीय माजी जुनियर राष्ट्रीय चॅम्पियनशिप कुस्तीपटूच्या हत्येप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असतानाच एक मोठी बातमी समोर येत आहे. कुस्तीपटूच्या हत्येप्रकरणात  ऑलिम्पिक मेडलिस्ट सुशील कुमारचंही नाव असल्याचानं त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान कुस्तीपटूच्या हत्येनंतर सुशील कुमार फरार असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकऱणी पोलिसांनी सुशीलच्या घरावर छापा टाकला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमवर मंगळवारी कुस्तीपटूंच्या दोन गटात वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं आणि त्यामध्ये 23 वर्षाचा कुस्तीपटूचा जागीच मृत्यू झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिल्ली पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचत तपासाची सूत्र हाती घेतली. 


या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारसह इतर दोन कुस्तीपटूंच्या घरावर छापा टाकल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात सुशील कुमारवर देखील गंभीर आरोप असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पोलिसांकडून सुशील कुमारचा शोध सुरू आहे. 


सुशील कुमार पळून गेल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. या कॅमेऱ्याच्या मदतीनं पोलिसांचा तपास सुरू आहे. या भांडणामध्ये दोन इतर खेळाडू देखील जखमी झाले आहेत. मृत व्यक्तीचं नाव सागर कुमार असल्याची माहिती मिळाली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी 12 च्या सुमारास कुस्तीपटूंच्या दोन गटात वाद झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार घटनास्थळी दाखळ होऊन पोलिसांनी जखमी खेळाडूंना रुग्णालयात दाखल केलं. सागरची प्रकृती अधिक खालवल्याने त्याला दिल्लीतील ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. बुधवारी उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. 


पोलिसांनी घटनास्थळावरून एक डबल बॅरल बंदूक ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी एक प्रिंस दलाल नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून पोलिसांकडून सुशील कुमारचा शोध सुरू आहे.