Virat Kohli Cryptic Instagram Story: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यानच्या (Ind vs Aus) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा (WTC Final) आज अंतिम दिवस आहे. आज 97 षटकांचा खेळ होणार असून भारतासमोर  भारताला विजयासाठी 280 धावांची गरज आहे. भारताचे 3 गडी तंबूत परतले आहे. सध्या भारताकडून विराट कोहली (Virat Kohli) आणि अजिंक्य राहणे (Ajinkya Rahane) मैदानात आहेत. शेवटच्या दिवशी विराट आणि अजिंक्याच्या खेळीवर भारत हा सामना जिंकणार की पराभूत होणार हे ठरणार आहे. असं असतानाच चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर विराटने पोस्ट केलेल्या इन्स्ताग्राम स्टोरीनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.


विराट आणि अजिंक्यची खेळ ठरवणार सामन्याचा निकाल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतासमोर 444 धावांचे लक्ष्य आहे. चौथ्या दिवशी 40 षटकांमध्ये भारताने 164 धावांपर्यंतचा टप्पा गाठला असून या मोबदल्यात भारताचे सलामीवर तंबूत परतले आहेत. यामध्ये रोहित शर्मा, शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजाराचा समावेश आहे. सध्या अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली मैदानावर आहेत. या दोघांमध्ये नाबाद 71 धावांची पार्टनरशीप झाली आहे. पाचव्या दिवशी गोलंदाजांसमोर टिकून राहणं आणि धावा करत राहण्याचा एकमेव पर्याय भारतीय फलंदाजांसमोर आहे. त्यातही सर्वांच्या नजरा विराट आणि अजिंक्यवर असून हे दोघे कशी फलंदाजी करतात यावर सामन्याचा निर्णय अवलंबून असेल. एकीकडे भारतीय चाहते विराटच्या कामगिरीकडे डोळे लावून बसलेले असतानाच त्याने इन्स्ताग्रामवर पोस्ट केलेल्या स्टोरीमुळे विराटच्या मनात नेमकं काय सुरु आहे हे मात्र चाहत्यांना कळेनासं झालं आहे. 


काय आहे विराटची पोस्ट


सामन्याच्या चौथ्या दिवसानंतर विराटने इन्स्ताग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने आपण काही गोष्टी सोडण्याची सवय लावली पाहिजे असं म्हटलं आहे. "जर आपण खूप काळजी, भीती आणि शंकांसहीत जगत राहिलो तर आपल्याकडे जगण्यासाठी आणि प्रेम करण्यास स्पेसच (वेळच) शिल्लक राहणार नाही. त्यामुळे आपण गोष्टींना सोडून देण्याचा सराव केला पाहिजे," असं विराटने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ही स्टोरी शेअर करताना विराटने वाकून नमस्कार करतानाचा किंवा प्रार्थना करण्यासाठी वापरला जाणारा इमोजी वापरला आहे. विराटला या पोस्टमध्ये नेमकं काय सुचवायचं आहे यावरुन चाहते संभ्रमात पडले आहेत. सोडून देण्याचा सराव केला पाहिजे या शब्दांचा संबंध पाचव्या दिवसाच्या खेळाशी जोडला जात असून अत्यंत महत्त्वाच्या दिवसाच्या आधीच विराटने ही पोस्ट करुन काय संकेत दिलेत याबद्दल तर्क लढवले जात आहेत. विराटने लढण्याआधीच हार मानलीय का? विराटच्या मनात नेमकं काय सुरु आहे? सामन्या निकाल बाकी असतानाच त्याआधी अशी पोस्ट त्याने का टाकली? असे प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केले जात आहेत.



सर्वाधिक धावसंख्या 263


ओव्हलच्या मैदानावर चौथ्या डावामध्ये यशस्वीपणे धावांचा पाठलाग करुन सामना जिंकणाऱ्या संघाची सर्वोत्तम धावसंख्या 263 इतकी आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांसमोर पाचव्या दिवशी जवळजवळ अशक्य वाटणारं आव्हान आहे असं तज्ज्ञ सांगत आहेत. 97 षटकांमध्ये 280 धावा हे समीकरण सोपं वाटत असलं तरी पाचव्या दिवशी खेळपट्टीची अवस्था पाहता ही धावसंख्या गाठणं आव्हानात्मक ठरणार आहे. मात्र भारतीय संघाने हा चमत्कार करुन दाखवला तर तब्बल 9 वर्षानंतर भारतीय संघ आयसीसीची कोणतीही स्पर्धा जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरेल.