WTC - चौथ्या दिवशी पावसाची बॅटिंग, पावसाने चाहत्यांची निराशा
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा चौथा दिवस पावसामुळे वाया
साऊथेम्टन : भारत आणि न्यूझीलंड दरम्यान खेळवण्यात येत असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा चौथा दिवस पावसामुळे वाया गेला. आज एकही चेंडू खेळवला गेला नाही. तब्बल पाच पाच वाट पाहण्यात आली, पण पावसाची थांबण्याची कोणतीही चिन्ह नव्हती, अखेर आजच्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. सामन्याचा पहिला दिवसही पावसाने वाया गेला होता.
पहिल्या डावात न्यूझीलंडचं पारडं जड
सामन्याच्या तिसऱ्या दिवस अखेर न्यूझीलंडने 2 विकेट गमावत 101 अशी धावसंख्या उभारली होती. डेव्हॉन कॉन्वे आणि टॉम लॅथम यांनी पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागिदारी केली. इंग्लंडमध्ये सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या डेव्हॉन कॉन्वेच्या (१५३ चेंडूंत १२ चौकारांसह ५४ धावा) अर्धशतकाचा यात समावेश आहे. भारतातर्फे आर अश्विन आणि ईशांत शर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली. दिवसअखेर कर्णधार केन विल्यमसन १२, तर रॉस टेलर शून्यावर नाबाद राहिला आहे.
भारताचा पहिला डाव
पहिल्या डावात भारतीय संघ 217 धावात गारद झाला. विराट कोहलीच्या 44 धावा आणि अजिंक्य रहाणेच्या 49 धावांव्यतिरिक्त एकाही भारतीय फलंदाजारा मोठी धावसंख्या उभारता आली नाही. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने 31 धावांत 5 विकेट घेत भारताच्या डावाला सुरूंग लावला.