मुंबई : भारतीय महिला टीमच्या प्रशिक्षकपदाची अखेर निवड करण्यात आली आहे. कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगस्वामी यांच्या समितीनं दक्षिण आफ्रिकेच्या गॅरी कर्स्टन यांच्याऐवजी डब्ल्यूव्ही रमण यांच्या नावाला पसंती दिली. बीसीसीआयमधल्या सूत्रांनी पीटीआयला याबाबत माहिती दिली आहे. ५३ वर्षांचे रमण हे सध्या नॅशनल क्रिकेट ऍकेडमी बंगळुरूमध्ये बॅटिंग सल्लागार आहेत. कर्स्टन हे कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगस्वामी यांची पहिली पसंती होते. पण आयपीएलमधल्या बंगळुरू टीमचं प्रशिक्षकपद सोडायला कर्स्टन तयार नव्हते. त्यामुळे रमण यांची नियुक्ती करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगस्वामी यांच्या समितीनं बीसीसीआयला कर्स्टन, रमण आणि व्यंकटेश प्रसाद या तिघांच्या नावाची शिफारस केली होती. यातल्या रमण यांची बीसीसीआयनं नियुक्ती केली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा बीसीसीआयनं अजूनपर्यंत केलेली नाही.


डब्ल्यूव्ही रमण हे भारताकडून ११ टेस्ट आणि २७ वनडे खेळले आहेत. याआधी त्यांनी तामीळनाडू आणि बंगालच्या रणजी टीमचं प्रशिक्षकपदही भुषवलं आहे. रमण हे भारताच्या अंडर-१९ टीमचे प्रशिक्षकही होते. १९९२-९३ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात रमण यांनी शतक केलं होतं. दक्षिण आफ्रिकेत शतक करणारे रमण हे पहिले भारतीय खेळाडू होते.


कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगस्वामी यांच्या समितीनं २८ जणांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये कर्स्टन, रमण, व्यंकटेश प्रसाद, मनोज प्रभाकर, ट्रेन्ट जॉनसन, डिमिट्री मॅस्करेनस, ब्रॅड हॉग आणि कल्पना वेंकटाचर यांचा समावेश होता. यापैकी कर्स्टन, रमण आणि व्यंकटेश प्रसाद या तिघांच्या नावाची समितीनं बीसीसीआयला शिफारस केली. यामध्ये कर्स्टन पहिली पसंती, रमण दुसरी आणि व्यंकटेश तिसरी पसंती होती.


कर्स्टन यांनी आयपीएलच्या बंगळुरू टीमचं प्रशिक्षकपद सोडण्यास नकार दिल्यामुळे अखेर रमण यांची निवड करण्यात आली. कर्स्टन हे याआधी भारताच्या पुरुष टीमचे २००८ ते २०११ पर्यंत प्रशिक्षक होते. कर्स्टन प्रशिक्षक असतानाच भारतानं २०११ सालचा वर्ल्ड कप जिंकला होता. यानंतर कर्स्टन २०११ ते २०१३ पर्यंत दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षकही राहिले.


भारतीय टीमच्या प्रशिक्षक निवडीवरून सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीच्या सदस्यांमध्येही मतभेद होते. प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी नवीन प्रशिक्षक निवडीसाठी अर्ज मागवण्याचे आदेश बीसीसीआयला दिले. तर प्रशासकीय समितीच्या सदस्य डायना एडुल्जी यांनी प्रशिक्षक निवडीची प्रक्रिया थांबवायला सांगितली होती. ही प्रक्रिया विनोद राय यांच्या परवानगीनं होत असल्याचं बीसीसीआयचे खजिनदार अनिरुद्ध चौधरींनी सांगितलं.


पुढच्या महिन्यात होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्यापर्यंत रमेश पोवार यांना प्रशिक्षक म्हणून कायम ठेवा अशी मागणी डायना एडुल्जी यांनी केली होती. भारताच्या टी-२० टीमची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मंधाना यांनीही पोवार यांना प्रशिक्षक ठेवावं, असं पत्र बीसीसीआयला लिहीलं होतं. पण विनोद राय यांनी नव्या प्रशिक्षक निवडीसाठी अर्ज मागवण्याचे आदेश बीसीसीआयला दिले.


वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्ड कपदरम्यान इंग्लंडविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये मिताली राजला टीममधून वगळण्यात आलं. या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला. टीममधून वगळल्यानंतर मिताली राजनं रमेश पोवार आणि डायना एडुल्जींवर गंभीर आरोप केले. या दोघांनी माझी क्रिकेट कारकिर्द संपवायचा प्रयत्न केला आणि माझ्यासोबत भेदभाव केल्याचं मिताली म्हणाली.


रमेश पोवार यांनीही मिताली राजच्या या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. वर्ल्ड कपदरम्यान ओपनिंगला खेळवलं नाही तर निवृत्ती घेईन, अशी धमकी मितालीनं दिल्याचा दावा रमेश पोवार यांनी केला. ३० नोव्हेंबर रोजी रमेश पोवार यांचा भारतीय महिला टीमच्या प्रशिक्षकपदाचा करार संपला होता. यानंतर प्रशिक्षकपदाची जागा रिकामी होती.