भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आता 37 वर्षांचा आहे. 2026 मध्ये पुढचा टी-20 वर्ल्डकप होईल तेव्हा रोहित शर्मा 39 वर्षांचा झालेला असेल. त्यामुळे 2026 चा हा वर्ल्डकप त्याचा अखेरचा वर्ल्डकप असण्याची शक्यता आहे. रोहितने आतापर्यंत 11 वर्ल्डकप खेळले असून यामध्ये 8 टी-20 आणि 3 एकदिवसीय वर्ल्डकप खेळले आहेत. 2007 मध्ये भारताने वर्ल्डकप जिंकला तेव्हा रोहित शर्मा संघात होता. रोहितची 2027 चा वर्ल्डकप खेळण्याची इच्छा आहे. पण त्याचा फॉर्म आणि फिटनेस चांगला असले तरच त्याला संधी मिळेल. पण भारतीय क्रिकेटमध्ये एकदा खेळाडू 40 वयापर्यंत पोहोचला तर त्याची निवृत्तीही जवळ येते. सचिन तेंडुलकर वयाच्या 40 आणि धोनी 39 वयापर्यंत खेळला आहे. पण करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर त्यांच्या फॉर्मवर प्रश्चचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. त्यामुळे रोहित शर्माला जर पुढील वर्ल्डकप खेळायचा असेल तर या गोष्टींचा विचार करावा लागेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यादरम्यान युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी बीसीसीआयला खेळाडूंचं वय आणि निवृत्ती याबाबत विचार करु नये असा सल्ला दिला आहे. तसंच जोपर्यंत रोहित शर्माचा फॉर्म आणि फिटनेस कायम आहे त्याला खेळू द्यावं असंही सुचवलं आहे. योगराज सिंग यांनी 1980 ते 1981 दरम्यान भारताकडून एक कसोटी आणि सहा एकदिवसीय सामने खेळले आहेत. रोहित हा दुर्मिळ खेळाडूंपैकी एक आहे ज्याच्यासाठी विरेंद्र सेहवागप्रमाणे तंदुरुस्ती हा कधीच अडथळा ठरला नाही. भारताचा कर्णधार 50 वर्षांचा होईपर्यंत भारतासाठी खेळत राहू शकतो असं ते म्हणाले आहेत. 


"जेव्हा वयाबद्दल चर्चा होते तेव्हा मला ती समजत आहे. या खेळाडूचं इतकं वय झालंय या चर्चेला अर्थ नाही. जरी तुम्ही 40, 42 किंवा 45 वर्षांचे असलात, तरी त्यात चुकीचं काय? आपल्या देशात लोकांना तुम्ही 40 वर्षाचे असलात तर वय झालं आहे असं वाटतं. आता तुमचं मूल होण्याचं वय झालं असून सगळं संपलं आहे असं सांगतात. पण तुम्ही संपला नाहीत हेच सत्य आहे," असं योगराज सिंग यांनी स्पोर्ट्स 18 ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.


"मोहिंदर अमरनाथ यांनी भारतासाठी वर्ल्डकप जिंकला तेव्हा 38 वर्षांचे होते. अंतिम सामन्यात ते प्लेअर ऑफ द मॅच होते. त्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये वयाचा मुद्दा कायमचा बंद केला पाहिजे. रोहित शर्मा आणि विरेंद्र सेहवाग हे असे दोन महान खेळाडू आहेत ज्यांना कधीच फिटनेस आणि ट्रेनिंगचा विचार केला नाही. तो 50 वर्षांचा होईपर्यंत खेळू शकतो," असं योगराज सिंग म्हणाले आहेत,


कर्णधार आणि खेळाडू या दोन्ही भूमिकेत रोहितसाठी पुढील 18  महिने खूप महत्त्वाचे आहेत. T20 विश्वचषकानंतर, भारत संघ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहेत. यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल असेल. त्यामुळे 2027 च्या विश्वचषकाप्रमाणेच T20 विश्वचषक 2026 देखील मोठा पल्ला आहे. रोहितचा फॉर्म सध्या घसरत आहे. 13 सामन्यांत त्याने ३४९ धावा केल्या आहेत. यामुळे त्याला आव्हानाचा सामना करावा लागेल.