मुंबई : भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली हा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या वनडे सीरिजच्या पहिल्या तिन्ही मॅचमध्ये विराटनं ३ शतकं झळकावली. याचबरोबर विराट वनडेमध्ये सर्वात जलद १० हजार रन पूर्ण करणारा पहिला बॅट्समन बनला आहे. याआधी हे रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर होतं. मैदानावर खोऱ्यानं रन आणि रेकॉर्ड करणारा विराट कोहली एका व्यक्तीवर चांगलाच भडकला आहे. विराट कोहलीचा हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहली हा बॅट्समन म्हणून अवाजवी महत्त्व दिलं जातं. त्याच्या बॅटिंगमध्ये काहीच विशेष नाही. भारतीय खेळाडूंपेक्षा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची बॅटिंग बघणं मी जास्त पसंत करतो, असं सोशल नेटवर्किंगवर एक भारतीय म्हणाला. विराट कोहलीनं या व्यक्तीची प्रतिक्रिया वाचली. ''माझ्यावर तुम्ही टीका केली तरी मला फरक पडत नाही. पण भारतात राहणाऱ्या एखाद्याला भारतीय खेळाडू आवडत नसतील तर त्यांनी भारतात राहू नये'', असं विराट कोहली म्हणाला.


तुम्ही भारतात राहू नका, दुसरीकडे जाऊन राहा. तुम्ही आमच्या देशात राहून दुसऱ्या देशावर प्रेम का करता? असा सवाल विराटनं उपस्थित केला. माझ्यावर टीका केली तरी मला फरक पडत नाही. दुसऱ्या देशावर प्रेम करायचं असेल तर या देशात राहू नका, असं मला वाटतं. तुम्हाला प्राधान्य ठरवता आलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया विराटनं दिली.



वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये विराट जबरदस्त फॉर्ममध्ये होता. १५१ च्या सरासरीनं विराटनं ४५३ रन केले. या सीरिजमधला तो सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता.