मुंबई : भारताचा माजी फास्ट बॉलर जहीर खाननं भारतीय टीमला मोलाचा सल्ला दिला आहे. टीममध्ये डावखुऱ्या फास्ट बॉलरसाठी भारतीय टीम आणि निवड समिती उत्सुक आहे. पण स्वत: डावखुरा बॉलर असणाऱ्या जहीर खाननं यावर भाष्य केलं आहे. जर डावखुरा फास्ट बॉलर आव्हानासाठी तयार नसेल तर उतावळेपण दाखवण्याची गरज नाही. मागच्या काही वर्षांमध्ये भारतानं जयदेव उनाडकट, बरिंदर सरन या डावखुऱ्या बॉलरना संधी दिली. यानंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये खलील अहमदला संधी देण्यात आली. पण या तिघांनाही चमकदार कामगिरी करता आली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'वेगळेपण म्हणून तुमच्याकडे डावखुरा फास्ट बॉलर असेल तर त्याचा निश्चित फायदा होईल, पण डावखुरा फास्ट बॉलर टीममध्ये ठेवण्यासाठी उतावळेपणा दाखवण्याची काहीच गरज नाही. डावखुरे फास्ट बॉलर नैसर्गिक प्रतिभा असलेले असतात. तसंच तुम्हाला कधी असा बॉलर मिळेल, यावर तुमचं नियंत्रण नसतं,' अशी प्रतिक्रिया जहीरनं दिली.


न्यूझीलंडमधलं वातावरण स्विंग बॉलिंगला अनुकूल असतानाही खलीलनं तिकडे निराशाजनक कामगिरी केली. भारताकडून ९५ टेस्ट खेळणाऱ्या जहीरनं खलीलला त्याचा खेळ सुधारायला सांगितलं आहे.


'खलील अहमद आखूड टप्प्यावर बॉलिंग करत आहे. यामुळे जिकडे बॉल स्विंग होत असेल, तिकडे त्याला मदत मिळणार नाही. अशाठिकाणी तुम्हाला बॉलचा टप्पा वरती ठेवावा लागतो. बॉलरला या गोष्टी शिकाव्या लागतात. खलील त्याचा सहकारी जसप्रीत बुमराहकडून बऱ्याच गोष्टी शिकू शकतो. बुमराहनंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यावर चांगली प्रगती केली आहे,' असं जहीर म्हणाला.


भारतीय टीममध्ये आता फास्ट बॉलरचा समुह आहे. कठीण परिस्थितीमध्ये हे बॉलर एकमेकांना आधार देऊन एकमेकांवरचं ओझं कमी करू शकतात, असं जहीरला वाटतं. 'गेल्या काही मॅचमध्ये आपण बघितलं तर वेगवेगळ्या मॅचमध्ये वेगवेगळ्या बॉलरनी प्रभाव टाकला आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. मेलबर्नमध्ये बुमराहनं तर काहीवेळा मोहम्मद शमीनं शानदार स्पेल टाकले. ऍडलेडमध्ये अश्विननं चांगली बॉलिंग केली. जेव्हा ओझ्याचं वाटप होतं, तेव्हा ते निश्चितच चांगलं असतं आणि याचा तुम्हाला निकालही मिळतो,' असं वक्तव्य जहीर खाननं केलं.


मागच्या वर्षभरामध्ये भारताच्या ४ फास्ट बॉलरनी टेस्ट क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक विकेट घेतल्या. भारतीय बॉलरनी वेस्ट इंडिजच्या माल्कम मार्शल, जोएल गार्नर, एन्डी रॉबर्ट्स आणि मायकल होल्डिंग या चार बॉलरचं रेकॉर्ड मोडलं.