Video: पठाणने पुन्हा दाखवून दिलं `बाप बाप असतो!` पाकिस्तानी गोलंदाजाच्या ओव्हरमध्ये 6, 6, 0, 6, 2, 4 धावा
Yusuf Pathan Thrashed Pakistan Pacer: युसूफ निवृत्त होऊन अनेक वर्ष झाली आहेत. मात्र त्याच्या फलंदाजीच्या शैलीमध्ये आणि धावा करण्याच्या गतीमध्ये थोडाही फरक पडलेला नाही. त्याच्या या तुफान फलंदाजीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Yusuf Pathan Thrashed Pakistan Pacer: भारताचा माजी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज इरफान पठाणचा भाऊ यूसुफ पठाण हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी त्याचा दमदार फॉर्म कायम आहे. तसा पठाणच्या निवृत्तीला फार काळ उलटून गेला. मात्र शुक्रवारी एका सामन्यात खेळताना यूसुफने पाकिस्तानच्या संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करणारा डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला धू धू धुतले!
यूसुफच्या खेळीने संघ जिंकला
यूसुफ पठाण सध्या झिम्बाब्वेमधील आयोजित करण्यात आलेल्या झिम्बावे एफ्रो 2023 टी-10 स्पर्धेमध्ये खेळत आहे. 90 मिनिटांमध्ये संपणाऱ्या या प्रत्येकी 10 ओव्हरच्या सामन्यांमध्ये यूसुफ जोहान्सबर्ग बफेलोज संघाकडून खेळत आहे. शुक्रवारी (28 जुलै रोजी) झालेल्या सामन्यामध्ये यूसुफने नाबाद 80 धावांची खेळी केली. या खेळीमुळेच यूसुफच्या संघाला मोहम्मद आमिरच्या संघाविरोधात 1 चेंडू आणि 6 गडी राखून दमदार विजय मिळवता आला.
आमिरच्या 12 चेंडूंमध्ये 42 धावा
या सामन्यामध्ये यूसुफ पठाणने मोहम्मद आमिरच्या एकाच ओव्हरमध्ये 3 उत्तुंग षटकार लगावले. एकाच ओव्हरमध्ये पठाणने 24 धावा काढल्या. 36 कसोटी सामने आणि 61 एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 31 वर्षीय मोहम्मद आमिरच्या 2 ओव्हरमध्ये पठाणने तब्बल 42 धावा कुटल्या. अशी कामगिरी अनेकदा टी-20 सामन्यांमध्येही पाहायला मिळत नाही.
8 षटकार आणि 5 चौकार
आमिर ज्या जबरन कलंदर्स संघाकडून खेळतोय त्या संघाने आपल्या निर्धारित 10 ओव्हरमध्ये 4 विकेट्सच्या मोबदल्यात 140 धावा केल्या. मात्र यूसुफच्या फलंदाजीच्या जोरावर 9.5 ओव्हरमध्येच जोहान्सबर्ग बफेलो संघाने ही धावसंख्या गाठली. यूसुफने या सामन्यात केवळ 26 चेडूंमध्ये 5 चौकार आणि 8 षटकांच्या मदतीने 80 धावा केल्या. यूसुफच्या तुफान फलंदाजीसमोर आमिरच्या गोलंदाजीचा पालापाचोळा झाला. सीमेपार जाणाऱ्या चेंडूंकडे पाहण्याशिवाय आमिरला काहीच करणं शक्य नव्हतं.
अनेक भारतीय खेळाडूंचा समावेश
झिम्बावे एफ्रो टी-10 स्पर्धा 20 जुलैपासून सुरु झाली असून अंतिम सामना 29 जुलै रोजी होणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने हरारेमध्ये खेळवले जात आहेत. या स्पर्धेत 5 संघ खेळत आहेत. या स्पर्धेत भारताचे अनेक खेळाडू खेळत आहेत. यात स्टुअर्ट बिन्नी, पार्थिव पटेल, रॉबीन उथप्पा, इरफान पठाण, एस. श्रीशांत, यूसुफ पठाण या खेळाडूंचा समावेश आहे.