Zimbabwe Cricketers Salary: टीम इंडियाच्या तुलनेत झिंबाब्वेच्या खेळाडूंना मिळते `इतकी` सॅलरी, जाणून घ्या
कधी फाटलेले बूट घातले, तर कधी बोर्डाशी भांडण केलं, आता टी20 वर्ल्ड कपमध्ये बलाढ्य टीमसना देतायत टक्कर, तरीही झिंबाब्वेच्या खेळाडूंना मिळतेय `इतकी` सॅलरी ?
पर्थ : टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2022) दुबळ्या समजल्या जाणाऱ्या झिंबाब्वे (Zimbabwe) संघाने भल्या भल्या टीमना पराभवाचे पाणी पाजले आहे. त्यामुळे सध्या टी20 वर्ल्ड कपमध्ये झिंबाब्वे संघाची चर्चा आहे. हा संघ क्रिकेट कामगिरी व्यतिरीक्त इतर कारणांमुळे देखील चर्चेत राहीला आहे. जसे कधी फाटलेले बूट घालून मैदानात उतरला, बोर्डाशी भांडण केलं, या अशा कारणांमुळे तो नेहमीच चर्चेत आला आहे. सध्या झिंबाब्वे संघ टी20 वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करतोय. मात्र त्या तुलनेत त्यांना तितकासा बोर्डाकडून पगार मिळत नाही. नेमका झिंबाब्वेच्या खेळाडूंना किती पगार आहे? हे जाणून घेऊयात.
झिंबाब्वे (Zimbabwe) संघाने T20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) आपल्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. सुपर-12 फेरीच्या सामन्यात झिंबाब्वेने (Zimbabwe vs Pakistan) पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघाचा पराभव केला. क्रेग इर्विनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आता एका रिपोर्टमध्ये असे समोर आले आहे की,तिथल्या क्रिकेटपटूंचा पगार खूपच कमी आहे. अनेक खेळाडूंची आर्थिक स्थिती इतर देशांच्या क्रिकेटपटूंच्या तुलनेत खूपच बिकट असल्याची माहिती आहे.
झिंबाब्वे क्रिकेटची बिकट अवस्था
काही वर्षापुर्वी झिंबाब्वे (Zimbabwe) क्रिकेटची अवस्था अतिशय बिकट होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी संघातील खेळाडूंकडे योग्य शूज देखील नव्हते. फाटलेले बुट घालून हे खेळाडू मैदानात उतरायचे. या संघाचा स्वतःचा क्रिकेटर रायन बर्ले याने सोशल मीडियावर एक छायाचित्र पोस्ट केले. बुरले यांनी संघासाठी प्रायोजकांचे आवाहन केले. त्यानंतर अनेक कंपन्या मदतीसाठी पुढे आल्या होत्या. त्यामुळे खेळाडूंची अवस्था किती बिकट होती हे संपुर्ण क्रिकेट विश्वाने पाहिले होते.
किती मॅच फिस मिळते?
झिबाब्वेचा (Zimbabwe) स्थानिक वृत्तपत्र द स्टँडर्डच्या वृत्तानुसार, झिबाब्वेच्या खेळाडूंना कसोटी सामन्यासाठी 2000 डॉलर (सुमारे 1.64 लाख रुपये), एकदिवसीय सामन्यासाठी 1000 डॉलर (सुमारे 82 हजार रुपये) आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी 500 डॉलर (41 हजार रुपये) मिळतात. झिबाब्वेचा सर्वात मोठ्या क्रिकेट लीगचे नाव नॅशनल प्रीमियर लीग आहे, जे जिंकल्यावर संघाला 8.50 लाख रुपये दिले जातात. आयपीएल लिलावात खेळाडूची किमान आधारभूत किंमत 20 लाख रुपये आहे.
खेळाडूंची चार श्रेणींमध्ये विभागणी
एका अहवालानुसार, झिबाब्वेचे (Zimbabwe Players) खेळाडू X, A, B आणि C या चार श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत. ग्रेड X च्या खेळाडूंना दरमहा पाच हजार अमेरिकन डॉलर (सुमारे 4.11 लाख रुपये) मिळतात. ग्रेड A खेळाडूंना दरमहा 3500 यूएस डॉलर (सुमारे 2.80 लाख रुपये) दिले जातात, तर ग्रेड B खेळाडूंना दोन हजार डॉलर (सुमारे 1.64 लाख रुपये) मिळतात. ग्रेड C खेळाडूंना दरमहा $1500 (सुमारे 1.23 लाख रुपये) मिळतात.
भारतीय खेळाडूंना कितीतरी पट जास्त मॅच फी मिळते?
टीम इंडियाच्या खेळाडूंना कसोटी क्रिकेटमधील एका सामन्यासाठी 15 लाख रुपये मिळतात. तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुरुषांना एका सामन्यासाठी 6 लाख रुपये दिले जातात. तसेच T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक सामना खेळण्यासाठी 3 लाख रुपये दिले जातात. झिबाब्वेच्या खेळाडूंच्या तुलनेत कितीतरी पट जास्त मॅच फी टीम इंडियाच्या खेळाडूंना मिळते.
दरम्यान टी20 वर्ल्ड कपमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या झिबाब्वेचा बांगलादेश विरूद्ध पराभव झाला. बांगलादेशने झिबाब्वेचा विरूद्धचा सामना 3 धावांनी जिंकला होता.