VIDEO: ब्राव्होच्या गाण्यावर खेळाडूंच्या मुलांचा डान्स
कॅरेबियन खेळाडू आणि आयपीएलमधल्या चेन्नई टीमचा ऑलराऊंडर ड्वॅन ब्राव्होने त्याचं लोकप्रिय गाणं `चॅम्पियन`चं नवीन व्हर्जन रिलीज केलं आहे.
मुंबई : कॅरेबियन खेळाडू आणि आयपीएलमधल्या चेन्नई टीमचा ऑलराऊंडर ड्वॅन ब्राव्होने त्याचं लोकप्रिय गाणं 'चॅम्पियन'चं नवीन व्हर्जन रिलीज केलं आहे. रिलीज झाल्यानंतर लगेचच या गाण्याला युट्यूबवर हिट्स मिळत आहेत. या गाण्यात चेन्नई टीमचे क्रिकेटपटू, सपोर्ट स्टाफ आणि खेळाडूंची मुलं दिसत आहेत.
'Champion Super Cub' या नावाने रिलीज झालेल्या या गाण्यात कर्णधार धोनीची मुलगी झिवा, सुरेश रैनाची मुलगी ग्रेसिया, हरभजनची मुलगी हिनायासोबत इतर खेळाडूंची मुलंही आहेत. या गाण्यामध्ये खेळाडूंच्या मुलांची नावंही घेतली आहेत. या व्हिडिओमध्ये ब्राव्हो गातानाही दिसत आहे, तसंच खेळाडूंची मुलं मजा-मस्ती करताना दाखवली आहेत.
एमएस धोनीची पत्नी साक्षी धोनीने हा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. 'मुलांना स्वत:चं गाणं मिळालं. धन्यवाद ड्वॅन ब्राव्हो', असं कॅप्शन साक्षी धोनीने या व्हिडिओला दिलं आहे.
ब्राव्होचं म्यूझिकबद्दलचं प्रेम नवीन नाही. याआधी आयपीएल २०१८ च्या मोसमात ब्राव्होने 'रन द वर्ल्ड' हे गाणं रिलीज केलं होतं. त्यावेळी ब्राव्होच्या गाण्यावर विराट, केएल राहुल आणि हरभजन सिंग नाचले होते. टी-२० वर्ल्ड कप २०१६ दरम्यान ब्राव्होचं 'चॅम्पियन' गाणंही लोकप्रिय झालं होतं.
यंदाच्या आयपीएल मोसमात ड्वॅन ब्राव्होने ७ मॅचमध्ये ९ विकेट घेतल्या आहेत आणि ६४ रनही केल्या आहेत. दुखापतीमुळे ब्राव्होला काही मॅचना मुकावं लागलं होतं. चेन्नईने या मोसमात खेळलेल्या १२ मॅचपैकी ८ मॅच जिंकल्या आहेत. १६ पॉईंट्ससह चेन्नई पहिल्या क्रमांकावर आहे.