११ टिप्स : प्रवास करताना गाडीची नेमकी कशी काळजी घ्याल?
हल्ली लाँग विकेंड म्हटलं की फिरण्याचा प्लान हमखास होतोच.
मुंबई : हल्ली लाँग विकेंड म्हटलं की फिरण्याचा प्लान हमखास होतोच.
मग अशा वेळी आपली हक्काची कार घेऊन फिरण्याचा वेगळाच आनंद असतो. आता २६ जानेवारी ते २८ जानेवारी असा लाँग विकेंड आला आहे. आता अनेक जण हा प्लान करत असतील. दूरचा प्रवास सुखकारक होण्यासाठी स्वतःची आणि आपल्या गाडीची काळजी घेणे खूप महत्वाचे असते.
अनेकदा आपण पाहिलं आहे लाँग विकेंडला गाडी घेऊन निघालो की, गाडी बंद होणं हा अनेकांचा अनुभव आहे. अशावेळी नेमकी कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेणं महत्वाचं आहे. दुचाकी, चारचाकी गाडीचा वापर प्रवासात करीत असताना कश्या पद्धतीने प्रवास करावा याच्या टिप्स टेक एक्सपर्ट सागर जोशी यांनी दिल्या.
११ महत्वाच्या टिप्स जाणून घ्या
1. लॉग टूरला अर्थात दूरच्या प्रवासाला गाडी घेऊन जाणार असाल तर किमान दोन दिवस आधी मॅकेनीककडून व्यवस्थीत चेक करुन घ्या. (उदा. इंजीन ऑईल, बॅटरीचे टर्मिनल, वायपर, ब्रेक ऑईल,टायरची हवा, गाडीची स्टेपनी, ब्रेक इ.) दोन दिवस अगोदरच मेकॅनिककडे गाडी घेऊन जावी कारण अधिक काम निघाल्यास दुरुस्ती करण्यासाठी मेकॅनिक ला वेळ मिळतो.
2. ज्या दिवशी प्रवासाला निघाल त्या दिवशी गाडी मध्ये सर्व गाडीचे कागद पत्र (उदा. आर.सी बुक, इन्श्युरन्स, पी.यु.सी ) सोबत घ्यावे.
3. प्रवासाला जाताना नेहमी गाडीमध्ये औषधोपचार बॉक्स, काही महत्वाच्या गोळ्या ठेवाव्यात. लहान मुलाना घेऊन जाणार असाल तर सोबत त्याच्यासाठी सुद्धा उलटी, मळमळच्या गोळ्या सोबत घ्याव्यात.
4. किमान २ लिटर पाण्याच्या भरलेल्या बॉटल गाडीत इमर्जन्सीच्या वेळेला असणे आवश्यक आहे.
5. प्रवासात सोबत कोणी लहान मुले असल्यास त्या लहान मुलांना मागच्या सीटवर बसवणे योग्य असेल.
6. शक्यतो प्रवास करताना एसीचा फ्लो आपल्या चेहऱ्यावर नसावा. गाडीमध्ये शक्यतो धुम्रपान, ओले पदार्थ खाणे टाळावे. गाडीमध्ये दुर्गधी पसरणार नाही याची काळजी घ्यावी.
7. लहान मुले गाडीत असल्यास पॉवर विन्डों स्विच, सेंट्रल लॉकिंग बंद करावे. जेणे करुन लहान मुलगा गाडीचा दरवाजा किंवा पॉवर विंडो अचानक उघडणार नाही. याची काळजी घ्यावी.
8. प्रत्येक १०० किलोमिटर ला थोडी विश्रांती घेतली तर उत्तम. कारण प्रवासात थकवा, पाय आखडने होऊ शकते. थोडावेळ विश्राती केल्याने चालक फ्रेश राहतो.
9. विश्रांती जेव्हा घेण्यासाठी थांबाल तेव्हा गाडीच्या टायरमध्ये प्रेशर बरोबर आहे की नाही ह्याची काळजी घ्या.
10. परतीचा प्रवास करताना पुन्हा गाडीची बेसिक तपासणी करा.
11. प्रवास पूर्ण झाल्यावर, घरी पोहचलात की, गाडी व्यवस्थीत आतमधून-बाहेरुन स्वच्छ धुवून घेणे. त्यामुळे गाडी स्वच्छ राहील.